बजाज इलेक्ट्रिकल्सचे कर्मचारी मागण्यांवर ठाम
आंदोलन कायम : स्वेच्छानिवृत्ती घेतल्याचा कंपनीचा दावा
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ९ : गोंदे दुमाला (ता. इगतपुरी) येथील बजाज इलेक्ट्रिकलच्या कर्मचाऱ्यांनी कामावर पूर्ववत घ्यावे, या मागणीसाठी आंदोलन पुकारले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीन दिवसांपासून हे कर्मचारी आंदोलन करीत असून, मागण्यांवर ते ठाम आहेत. दरम्यान, आंदोलनावर कंपनी व्यवस्थापनाने भूमिका स्पष्ट करताना संबंधित कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्याचे स्पष्ट केले.
बजाज इलेक्ट्रिकलच्या १०० हून अधिक कर्मचाऱ्यांनी कंपनी व्यवस्थापनाविरोधात एल्गार पुकारला आहे. कामावर परत घेण्याची मागणी करीत त्यांनी आंदोलन सुरू केले. या आंदोलनावर कंपनी व्यवस्थापनाने निवेदन दिले. त्यात नोंदणीकृत कर्मचारी संघटनेशी आवश्यक चर्चा करून कंपनीने फेब्रुवारी २०२५ मध्ये स्वेच्छानिवृत्ती योजना लागू केली. त्यात ८८ कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली; तर २७ कर्मचाऱ्यांनी स्वेच्छेने राजीनामा दिला. त्यानंतर त्यांना कंपनीकडून देण्यात आलेल्या सर्व वैधानिक देयकांसह आणि अतिरिक्त सानुग्रह लाभांसह त्यांचा पूर्ण व अंतिम हिशेब अदा करण्यात आला. स्वेच्छानिवृत्तीनंतर नऊ महिन्यांनी ४१ माजी कर्मचाऱ्यांनी पुनर्नियुक्तीची मागणी करीत कामगार प्राधिकरणाकडे दाद मागितली. परंतु, स्वेच्छानिवृत्तीवेळी संबंधितांना सर्व देयके दिल्याने व अंतिम निपटारा झाल्यावर पुनर्नियुक्ती करणे शक्य नसल्याची भूमिका कंपनीने घेतली आहे.
औद्योगिक सौहार्द कायम राखण्याच्या दृष्टीने, बजाज इलेक्ट्रिकल्सने ४१ माजी कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र कंत्राटदारामार्फत पर्यायी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यास सहमती दर्शविली आहे. सहायक कामगार आयुक्तांच्या कार्यालयाने संबंधित व्यक्तींना कंत्राटदारामार्फत उपलब्ध करून दिलेल्या व्यवस्थेबाबत कळविले होते. पण, तरीही एकाही व्यक्तीने ही संधी स्वीकारली नसल्याचे स्पष्टीकरण कंपनीकडून देण्यात आले.