‘त्या’ कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्या
बजाज इलेक्ट्रिकल्स कंपनी व्यवस्थापनाचे स्पष्टीकरण
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १० : गोंदे-दुमाला (ता. इगतपुरी) येथील बजाज इलेक्ट्रिकलच्या कर्मचाऱ्यांनी कामावर पुर्ववत घ्यावे या मागणीसाठी आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनावर कंपनी व्यवस्थापनाने त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. आंदोलनकर्ते कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली असून कंपनी नियमानुसार त्यांची पुनर्स्थापना करणे शक्य नसल्याचे कंपनी व्यवस्थापनाकडून स्पष्ट करण्यात आले.
बजाज इलेक्ट्रिकलचे शंभराहून कर्मचाऱ्यांनी कंपनी व्यवस्थापनाविरोधात आमरण उपोषण आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनावर कंपनी व्यवस्थापनाने निवेदन दिले. त्यात नोंदणीकृत कर्मचारी संघटनेशी आवश्यक चर्चा करून कंपनीने फेब्रुवारी २०२५ मध्ये स्वेच्छानिवृत्ती योजना लागू केली. त्यामध्ये ८८ कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. तर २७ कर्मचाऱ्यांनी स्वेच्छेने राजीनामा दिला. त्यानंतर त्यांना कंपनीकडून देण्यात आलेल्या सर्व वैधानिक देयकांसह आणि अतिरिक्त सानुग्रह लाभांसह त्यांचा पूर्ण व अंतिम हिशोब अदा करण्यात आला. स्वेच्छानिवृत्तीनंतर नऊ महिन्यांनी, ४१ माजी कर्मचाऱ्यांनी पुनर्नियुक्तीची मागणी करत कामगार प्राधिकरणांकडे दाद मागितली. पण, स्वेच्छानिवृत्तीवेळी संबंधितांना सर्व देयके दिल्याने व अंतिम निपटारा झाल्यानंतर पुनर्नियुक्ती करणे शक्य नसल्याची भूमिका कंपनीने घेतली आहे.
औद्योगिक सौहार्द कायम राखण्याच्या दृष्टीने, बजाज इलेक्ट्रिकल्सने ४१ माजी कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र कंत्राटदारामार्फत पर्यायी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यास सहमती दर्शविली आहे. सहाय्यक कामगार आयुक्तांच्या कार्यालयाने संबंधित व्यक्तींना कंत्राटदारामार्फत उपलब्ध करून दिलेल्या व्यवस्थेबाबत कळविले होते. पण, तरीही एकाही व्यक्तीने ही संधी स्वीकारली नसल्याचे स्पष्टीकरण कंपनीकडून देण्यात आले.
कर्मचारी मागण्यांवर ठाम
बजाज इलेक्ट्रिक्लस् कंपनीत पुनर्स्थापना मिळावी, यासाठी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण आंदोलन सुरु केले आहे. मागील चार दिवसांपासून हे आंदोलन कायम आहे. न्याय मिळेपर्यंत माघार नाही, अशी भूमिका संबंधित कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.