(पान ४ ला ॲंकर)
SKD26B04382
शिंदखेडा : बालाजी महाराजांच्या दर्शनासाठी झालेली भाविकांनी गर्दी.
---------
शिंदखेड्यात श्री बालाजी पालखी उत्साहात
खेड्या- पाड्यावरील हजारो भाविकांनी घेतले दर्शन
सकाळ वृत्तसेवा
शिंदखेडा, ता. २८ : येथील रथ पालखी उत्सवात दुसऱ्या दिवशी सायंकाळी सातला श्रीराम बालाजी मंदिरातून श्री बालाजी महाराजांची विधिवत पूजा करून पालखी मिरवणुकीस सुरवात झाली. याप्रसंगी परिसरातील खेड्या- पाड्यावरील हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.
भक्तांना श्रींचे जवळून दर्शन घेता यावे, यासाठी कोजागरी पौर्णिमेला असणाऱ्या रथ उत्सवानंतर बालाजी महाराजांची पालखीतून मिरवणूक काढण्याची परंपरा आहे. पालखी मिरवणुकीस मंगळवारी (ता. २७) सायंकाळी सातला सुरवात झाली. या वेळी भजनी मंडळ, वाद्य, वाजंत्री, ढोल- ताशांच्या गजरात पालखी उत्सवास सुरवात झाली. पालखीस झेंडूसह विविध फुलांनी सजविले होते. तसेच, आकर्षक विद्युत रोषणाई केली होती. पालखी मिरवणुकीत विविध वेशभूषा धारण केलेले वहन सर्वांचे आकर्षक ठरत होते. मिरवणुकीदरम्यान ठिकठिकाणी फटक्यांची आतशबाजी केली जात होती. पालखी मिरवणुकीची जवाबदारी भोई पंच मंडळावर होती.
भोई समाजाचे सुनील तमखाने, नाना मोरे, नारायण मोरे, दगडू मोरे, राहुल बोरसे, अविनाश तमखाने, प्रशांत वाडीले, आसाराम तमखाने, अशोक मोरे, विक्की तमखाने, अजय तमखाने, भिला मोरे, सुनील वाडीले आदींनी जबाबदारी पार पडली. परिसरातील हजारो भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले. पालखीतील बालाजी महाराजांची आरती व केळीचा नैवद्य प्रत्येक घरातील घरातील भाविक करत होते. ‘व्यंकट रमणा गोविंदा, जगतपालका गोविंदा’च्या जयघोषाने परिसर दुमदुमला होता. रात्रीच्या वेळी भाविकांची दर्शनासाठी गर्दी वाढत होती. विविध देव- देवतांच्या वेशभूषेतील असलेले वहन व सजीव देखाव्याचे सादरीकरण आकर्षक होते.
सजीव देखाव्यांनी भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. पालखी मिरवणुकीत मठाधिपती मेघशाम बुवा, हिम्मतसिंह राऊळ, नगराध्यक्ष कलावती माळी, अनिल वानखेडे, राकेश माळी, सुभाष माळी, अरुण देसले यांच्यासह नगरपंचायतीचे नगरसेवक, रथ उत्सव समितीचे पंचमंडळ, पालखीचे सेवेकरी उपस्थित होते. रात्री उशिरापर्यंत पालखी मिरवणूक सुरू होती.