(पान ४ ला सेकंड मेन)
----------
SGR26B07592
सोनगीर : रथमार्गाची पाहणी करताना सहायक पोलिस निरीक्षक तुषार देवरे व ग्रामस्थ.
---------
सोनगीरला श्री. बालाजींच्या रथयात्रेची तयारी पूर्ण
पोलिस प्रशासनाकडून मार्गाची पाहणी; पुतळ्यांची सफाई
सकाळ वृत्तसेवा
सोनगीर, ता. १९ : गावाचे वैभव, एकता व मानाचे प्रतिक व १७१ वर्षांची परंपरा असलेल्या भगवान श्री. बालाजींची रथयात्रा येत्या गुरुवारी (ता. २२) दुपारी साडेबाराच्या मुहूर्तावर निघेल. रथयात्रेच्या स्वागतासाठी भाविक सज्ज झाले आहेत. यानिमित्त तयारीला वेग आला असून, अनेक हात मदतीसाठी सरसावले आहेत. रथ, त्यावरील विविध पुतळे यांची साफसफाई सुरू आहे. दरम्यान रथयात्रानिमित्त भरणाऱ्या यात्रेत लाखोंची उलाढाल होते.
रथयात्रेनिमित्त रथाला पाण्याने धुवून तेल लावण्यात येत आहे. रथावर घोडे, रथ हाकणारे अर्जुन, भालदार, चोपदार आदी मुर्तींची सफाई करण्यात येत आहे. रथाला सजवण्यासाठी झेंडू फुलांच्या माळा, विद्यूत रोषणाई, जनरेटर आदींचे नियोजन झाले आहे. रथाला थांबवणे किंवा वळविण्यासाठी लाकडी मोगऱ्या लावतात. ती दरवर्षी बनवले जातात. लोहार समाजातील कारागीर मोगरे बनवून देतात. मोगऱ्या लावण्याचे जोखीम व कुशलतेचे कामासाठी अनेक युवक पुढे आले आहेत.
ग्रामस्थांचा मदतीचा हात
रथयात्रेसाठी मोठा खर्च अपेक्षित आहे. मात्र, त्यासाठी अनेकजण मदतीसाठी पुढे आले आहेत. माजी सरपंच लखन ठेलारी, ज्ञानेश्वर चौधरी, संदीप कासार यांनी रोख रक्कम दिली. पंचायत समितीचे माजी सदस्य अविनाश महाजन, गौरव कासार, राजेंद्र महाजन, रवींद्र माळी आदींनी आर्थिकसह फुलमाळा, रोषणाई, रंगरंगोटी व अन्य मदत देऊ केली आहे. प्रमुख मार्गावर रांगोळी सेवा गोपाल कासार यांनी देऊ केली आहे. मोहन सैंदाणे, शाम माळी, राजेंद्र जाधव, धनंजय कासार, राहुल देशमुख, प्रमोद शिंपी, आर. के. माळी, समाधान पाटील, निखिल परदेशी, संदीप पोतदार आदींनी १२ पोती नारळ दिले.
मार्गाची दुरुस्ती व्हावी
सहायक पोलिस निरीक्षक तुषार देवरे, अविनाश महाजन, ज्ञानेश्वर चौधरी, केदारेश्वर मोरे, लखन ठेलारी, आर. के. माळी, पराग देशमुख, धाकू बडगुजर, राजेंद्र जाधव, श्याम माळी, ग्रामपंचायत अधिकारी मेघश्याम बोरसे, अल्ताफ कुरेशी, शफीयोद्दीन पठाण, पिंटू भिल, किशोर पावनकर आदींसह काही सामाजिक कार्यकर्त्यांनी रथमार्गाची पाहणी करून रस्त्यावरील वस्तू हटविणे व मार्गाची दुरूस्ती सुचवली. अडचण येवू शकेल अशा बाबींचे नियोजन केले.