धुळे ः टुडे १ साठी
--
फोटो क्रमांक ः 33234....बालाजी रथ
--
धुळ्यात आज बालाजी रथोत्सव
-
मंदिरापासून मिरवणूक; १४६ वर्षांची परंपरा कायम
-
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २१ : शहरात सुमारे १४६ वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेला श्री भगवान बालाजींचा रथोत्सव गुरुवारी (ता. २२) होणार आहे. यानिमित्त गल्ली क्रमांक चारमधील श्री बालाजी मंदिर परिसरात रथाची साफसफाई, दुरुस्ती आणि सजावटीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. बालाजी रथोत्सव समितीतर्फे उत्सवाचे नियोजन करण्यात आले असून, विविध सामाजिक संस्था, संघटना आणि राजकीय पक्षांतर्फे ठिकठिकाणी महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. पोलिस बंदोबस्त तैनात असेल.
-
धुळे शहरातील बालाजी रथोत्सवाला ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व आहे. रथावरील भगवान बालाजींची मूर्ती स्व. विष्णुप्रसाद काकड महाराज यांचे आजोबा स्व. रामविलास महाराज यांनी आणल्याची आख्यायिका आहे. भगवान बालाजी यांनी स्वप्नात येऊन साक्षात्कार दिला आणि ही मूर्ती कोकणातील रत्नागिरी येथील पाचपिंपळा परिसरातील विहिरीत असल्याचे सांगितले, अशी श्रद्धा आहे. त्यानुसार रामविलास महाराज यांनी मूर्ती धुळ्यात आणून तिची प्राणप्रतिष्ठा केली.
राजस्थानमधील कुशल कारागिरांच्या मदतीने स्व. बाबुलाल बालाराम अग्रवाल यांनी रथाची निर्मिती केली. या रथात भगवान बालाजींची मूर्ती विराजमान करण्यात आल्यानंतर रथोत्सवाची परंपरा सुरू झाली. रथोत्सवातील पहिल्या आरतीचा मान स्व. बाबुलाल बालाराम अग्रवाल यांच्यानंतर त्यांच्या वारसदारांकडे आजही कायम असल्याची माहिती रथोत्सव समितीने दिली.
बालाजी मंदिरातून सुरू होणारी रथयात्रा लकी मेडिकल, चैनी रोड, सन्मान लॉज, लोकरे मेडिकल, आग्रा रोड, पाचकंदील, शहर पोलिस चौकी, कराचीवाला खुंट, फुलवाला चौक, महात्मा गांधी पुतळा, नगरपट्टी, ग. नं. ६, राणाप्रताप चौक, भगवा चौक, ग. नं. ४ आणि श्रीराम मेडिकल, सीमा हॅण्डलूममार्गे पुन्हा बालाजी मंदिराजवळ पोहोचणार आहे. ही मिरवणूक सुमारे २५ ते २६ तास चालते. त्यामुळे शहरातील प्रमुख मार्गांवर भाविकांची वर्दळ राहण्याची शक्यता आहे. रथोत्सवात भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले.