कर्तृत्वाचा आदर्श, कार्याचा दीपस्तंभ : बाळासाहेब वाघ

कर्तृत्वाचा आदर्श, कार्याचा दीपस्तंभ : बाळासाहेब वाघ
Published on: 
(जाहिरात विभागाकडून फोटो घ्यावा) कर्तृत्वाचा आदर्श, कार्याचा दीपस्तंभ : बाळासाहेब वाघ --------------------------------------------- कृषी पदवीचे ज्ञान, सहकारातील अनुभव आणि शिक्षण क्षेत्राविषयीची दूरदृष्टी यांच्या बळावर हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्याला आकार देणारे बाळासाहेब वाघ उर्फ भाऊ हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. कृषी, साखर कारखानदारी, जलसंधारण आणि व्यावसायिक शिक्षण क्षेत्रात त्यांनी उभारलेले कार्य भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठेवा आहे. सोमवारी (ता.१९) भाऊंची ९४ वी जयंती, त्यानिमित्त... - शेखर गायकवाड कृषी महाविद्यालयाच्या ११९ वर्षाच्या कार्यकाळात जे मोजके कृषी पदवीधर चमकत्या ताऱ्यासारखे लक्षात येतात, त्यामध्ये बाळासाहेब वाघ उर्फ भाऊ यांचा समावेश होतो. वयाच्या ९० व्या वर्षी अखंडपणे कष्ट करत आणि ज्ञानाची कास धरत भाऊंचे कृतार्थ जीवन लौकिक अर्थाने संपले असले तरी आजही भाऊ कुठेतरी शेतीची, कृषी महाविद्यालयाची, नव्या पिढीची किंवा साखर कारखान्याची चर्चा करीत बसले आहेत असाच भास होत आहे. नोकरीच्या निमित्ताने नाशिकला अपर जिल्हाधिकारी झाल्यावर भाऊंचा स्नेह अतिशय वाढला. त्यापूर्वी केवळ एक ज्येष्ठ कृषी पदवीधर म्हणून आम्ही त्यांना ओळखत होतो. विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने के. के. वाघ महाविद्यालयाच्या संकुलाला भेट होत असे. तेव्हा ८६ व्या वर्षी सहा मजले चढून जाऊन प्रत्येक शाखा ते दाखवत होते. भाऊंना भेटताना प्रत्येक वेळी मनात नेहमी एकच विचार यायचा, तो म्हणजे अशा वयापर्यंत आपण जरी जगलो तरी एवढे ॲक्टिव्ह राहू का? १९५० च्या दशकात पुण्याच्या ऐतिहासिक कृषी महाविद्यालयातून कृषी पदवी घेऊन भाऊंनी स्वतःचे एक मोठे शिक्षण साम्राज्य निर्माण केले. १९७० मध्ये वडील कर्मवीर पद्मश्री काकासाहेब वाघ यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाने क. का. वाघ शिक्षण संस्थेची स्थापना केली. सन २०१६ पर्यंत संस्थेची संस्थेच्या पाच शाळा व एक महाविद्यालय होते. या संकुलाचा विस्तार आता ३२ महाविद्यालये, तंत्रनिकेतन व शाळा अशा मोठ्या वटवृक्षांमध्ये झाले आहे. या जोरावर खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांचे महाराष्ट्राचे आणि भारताचे नेतृत्व आपोआपच भाऊंकडे चालत आले. ते अभियांत्रिकी असोसिएशनच्या अध्यक्षपदी विराजमान झाले. दहा वर्षाच्या त्यांच्या अथक प्रयत्नानंतर अभियांत्रिकी महाविद्यालयांना स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा प्राप्त करून देण्यात यश मिळाले. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या दुसऱ्या जलसिंचन आयोगाचे ते सदस्य होते. निफाड कारखान्याच्या आणि रानवड येथील कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये कोल्हापूर बंधारे बांधणे व पाणी अडवण्यामध्ये त्यांनी मोलाची कामगिरी केली. त्यांच्या वाट्याला अनेक मानसन्मान आले. असा हा अद्वितीय माणूस आपल्यात होऊन गेला याचा आम्हा सगळ्यांना अभिमान वाटत असताना असे अलौकिक देणे नियतीने हिरावून नेल्याचे दुःख देखील होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com