NSK26H34886
दुधाळे : येथे सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेतर्फे आयोजित बळीराजा पूजनाप्रसंगी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते.
---
सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेतर्फे बळीराजापूजन
नंदुरबार, ता. १२ : बलिप्रतिपदा व दिवाळी पाडव्यानिमित्त सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेतर्फे दुधाळे येथे बळीराजापूजन आदिवासी संस्कृती व परंपरेनुसार करण्यात आले. या वेळी पारंपरिक पद्धतीने नांगर, धान्य आदी शेतीशी संबंधित साहित्याची विधिवत पूजा करून बळीराजाला अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी राज्यातील दुष्काळी परिस्थिती, शेतकरी व शेतमजुरांचे प्रश्न, तसेच ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या सद्यःस्थितीवर चिंता व्यक्त करून शासनाकडे विविध मागण्या करण्यात आल्या.
शासनाकडून शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेली दुष्काळी मदत अत्यंत तुटपुंजी आहे. या मदतीतून शेतकरी आणि शेतमजुरांचे आर्थिक संकट दूर होणे शक्य नाही. त्यामुळे सर्व बाधित शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी, शेतमजूर व भूमिहीन कुटुंबांना वार्षिक ४८ हजार रुपये आर्थिक मदत द्यावी, सर्व शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण भागातील रहिवासी कुटुंबांना वर्षाला ६० हजार रुपये दुष्काळी निर्वाह भत्ता देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.
पर्यावरणीय बदलांमुळे निर्माण होणारे संभाव्य धोके ओळखून त्यावर मात करणारे पर्याय, तंत्रज्ञान आणि ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचे धोरण सरकारकडून राबविले जात असल्याची टीका या वेळी करण्यात आली. बळीराजाचा खरा इतिहास समाजाने समजून घेणे आवश्यक आहे, अशी भूमिका या वेळी मांडण्यात आली. बळीराजापूजन करून शेतकरी-कष्टकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी लढण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाला कॉ. विक्रम गावित, कॉ. जमुनाताई ठाकरे, कॉ. मनोहर वळवी, कॉ. सईद कुरेशी, कॉ. बाबूराव ठाकरे, कॉ. किशन वळवी आदी उपस्थित होते.