ॲंकर
(केळीची झाडे फोटो वापरावा)
---
यंदा केळी लागवड स्थिर राहण्याची शक्यता
खानदेशातील स्थिती; केळी रोपांच्या दरात मोठी घसरण
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २० : खानदेशात यंदा कांदेबाग किंवा सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत लागवड केल्या जाणाऱ्या केळीचे क्षेत्र जामनेर व बोदवड भागात घटण्याचा अंदाज आहे. तर अन्य ठिकाणी लागवड स्थिर राहण्याची शक्यता आहे. या कालावधीत लागवड केलेल्या केळीस दरही अनेकांना हवे तसे न मिळाल्याने लागवड मुबलक जलस्त्रोतांच्या भागात वाढणार नाही, असेही दिसत आहे. केळीचा खर्च वाढत आहे. केळी व्यापार आक्रसला आहे.
व्यापारात मनमानी, लूट सुरू आहे. मध्यम, हलक्या क्षेत्रात केळीला पाणी अधिक लागते, असेही अनेकांचे म्हणणे आहे. खानदेशात अलीकडे बारमाही केळी लागवड केली जाते. परंतु प्रमुख दोन बहरांत केळी पिकाची लागवड करण्याचा प्रघातही खानदेशात आहे. त्यात मृग बहर केळी पीक अधिक असते. या बहरातील केळीची लागवड ही मे अखेरीस ते जुलै या कालावधीत केली जाते. तर कांदेबाग केळीची लागवड ही सप्टेंबर अखेरीस आणि ऑक्टोबर व नोव्हेंबरमध्ये केली जाते. यात मृग बहर केळीची काढणी उष्णतेत असते. या काळात अनेकदा नैसर्गिक समस्या असतात. तसेच दरातही चढउतार होतात. सणासुदीत दर घसरले गणेशोत्सव, नवरात्र व पुढे दसरा, दिवाळीचे सण असतात. यामुळे या कालावधीत केळीला उठाव कायम असतो, असा समज काही वर्षे होता. पण मागील वेळेस गोकुळाष्टमी ते अगदी दिवाळीपर्यंत केळी दर २०० ते ४०० रुपये प्रतिक्विंटल असे होते. यंदाही गणेशोत्सवापासून केळी दरात घसरण झाली. अजूनही केळी दर अस्थिर आहेत. परिणामी कांदेबाग केळीची लागवड शाश्वत जलस्त्रोतांच्या भागातही वाढत नसल्याचे दिसत आहे.
कोट
आमच्या भागात तापी नदीमुळे पाणी मुबलक आहे. पण केळी लागवड वाढणार नाही. कारण केळी पिकात मोठा नफा नसतो. खर्चही वाढला आहे. दुसरीकडे कागदोपत्री केळी दर चांगले किंवा स्थिर, तेजीत दिसतात. पण केळीची कुठेही जाहीर दरात खरेदी होत नाही. हरभरा व अन्य कमी खर्च व कमी कालावधीची पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे.
- भगवान पाटील, शेतकरी, गाढोदा, ता. जि. जळगाव