धुळे : टुडे पान २ साठी...अवतीभवती
--
आजपासून बापूजी
पुण्यतिथी सोहळा
धुळे : देवपूर येथील श्री सद्गुरू बापूजी भंडारी संस्थानच्या वतीने सद्गुरू बापूजी भंडारी महाराज यांच्या ५० व्या सुवर्ण महोत्सवी पुण्यतिथी निमित्त १३ ते १७ नोव्हेंबर या कालावधीत पाचदिवसीय विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवात दररोज सकाळी सहाला काकड आरती, सकाळी नऊला अभिषेक पूजा आणि सायंकाळी साडेपाचला हरिपाठ होईल. १३ नोव्हेंबरला नामजप व सुंदरकांड, तर १४ नोव्हेंबरला श्रीराम नामजप आणि श्रृती भंडारी धारूरकर, ऋषिकेश धारकर व गीतगंध म्युझिकल टीम (छत्रपती संभाजीनगर) यांचा भक्तिगीतांचा कार्यक्रम होईल. १५ नोव्हेंबरला अभय भंडारी (पुणे) यांचे ‘गुरुकृपा ही केवलम’ या विषयावर प्रवचन व राजयोगी धुरी (मुंबई) यांची भजनसंध्या रंगेल. १६ नोव्हेंबरला गणपती सहस्त्रावर्तन, रेणुकामाता भजनी मंडळ (धुळे) यांचा भजन कार्यक्रम आणि धनश्री लेले (मुंबई) यांचे प्रवचन होईल. १७ नोव्हेंबरला मुख्य सोहळ्यात ध्वजारोहण, लघुरुद्राभिषेक, पादुकापूजन व कार्याचा आढावा घेतला जाईल, अशी माहिती संस्थानचे महासचिव प्रकाश भंडारी यांनी दिली. भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थानने केले आहे.
---
तलवारबाजी स्पर्धेत
हस्तीच्या खेळाडूंची बाजी
धुळे : दोंडाईचास्थित हस्ती चॅरिटेबल ट्रस्ट संचलित हस्ती पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी नंदुरबार जिल्हा क्रीडा संकुलात झालेल्या विभागस्तरीय तलवारबाजी (फेन्सिंग) स्पर्धेत यश मिळवले. १४, १७ व १९ वर्ष वयोगटांतील मुला-मुलींच्या गटात विद्यार्थ्यांनी आपला दबदबा राखत राज्यस्तरावर प्रवेश केला. प्राची खंडेराय, समीक्षा सपकाळे, जानवी बोरसे, आर्या सोनार, जिग्नेश पवार आणि स्पंदन रामोळे या विद्यार्थ्यांनी हे यश मिळवले. या यशाबद्दल हस्ती चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अशोक जैन, कार्याध्यक्ष किशोर जैन, हस्ती ग्रुप ऑफ स्कूलचे चेअरमन कैलास जैन, प्राचार्या रझिया दाऊदी, प्रशासन अधिकारी रेखा गाडेकर, समन्वयक मनोज ठाकूर व मंगलसिंग राजपूत यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. खेळाडूंना क्रीडा विभागप्रमुख प्रकाश खंडेराय, विशाल पवार आणि कामिनी पाटील यांचे मार्गदर्शन झाले.