बारी समाजाचा वधू-वर
परिचय मेळावा उत्साहात
-----
नागवेल प्रतिष्ठानतर्फे आयोजन; २७० इच्छुकांची नोंदणी
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १५ : बारी समाजातील विवाहयोग्य वधू-वरांना एकमेकांची ओळख व्हावी, विवाह जुळविण्याच्या प्रक्रियेला चालना मिळावी, या उद्देशाने येथील नागवेल प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित बारी समाज वधू-वर परिचय मेळावा रविवारी (ता.१५) उत्साहात झाला.
शहरातील खोटेनगर स्टॉप परिसरातील दीपलक्ष्मी मंगल कार्यालयात झालेल्या या मेळाव्याला समाजातील विवाहयोग्य वधू-वर, त्यांचे पालक, विविध क्षेत्रांतील मान्यवर व समाजबांधव उपस्थित होते. पुस्तिकेत २७० उपवर-वधूंची नोंदणी झाली. मेळाव्याचे उद् घाटन महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते झाले. नागवेल प्रतिष्ठानच्या उपवधू-वर सूचिचेही प्रकाशन करण्यात आले. यंदा मेळाव्याचे १६वे वर्षे होते.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून खासदार स्मिता वाघ, नगरसेवक विशाल भोळे, नगरसेविका माधुरी बारी, माजी नगरसेविका शोभा बारी, यावलचे नगरसेवक सुनील शिनकर, नगरसेविका वैशाली बारी, नागवेल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. नितीन बारी, प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद वराडे, उपाध्यक्ष योगेश येऊल, सचिव प्रकाश रोकडे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. दीपक बारी व संगीता बारी यांनी केले.