बीबीए, मंदिर व्यवस्थापनाला अल्प प्रतिसाद
उपकेंद्राच्या शिवनई कॅम्पसमध्ये एमबीएसाठी शंभर विद्यार्थ्यांनी घेतले प्रवेश
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.२७ ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शिवनई (ता. दिंडोरी) येथील नाशिक उपकेंद्रावर उपलब्ध अभ्यासक्रमांच्या प्रवेशाला विद्यार्थ्यांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. येथील एमबीए शिक्षणक्रमास शंभर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. बीबीए, मंदिर व्यवस्थापन या अभ्यासक्रमांना अल्प प्रतिसाद मिळाला आहे.
पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्रामार्फत विविध शिक्षणक्रम चालविले जातात. राज्यभरात बीबीए अभ्यासक्रमाला सीईटी परीक्षेच्या माध्यमातून प्रवेश दिला गेला. २०२६-२७ साठी उपकेंद्रात एकूण १८० जागा उपलब्ध असताना, प्रत्यक्षात २० जागांवर प्रवेश झाले आहेत. आता उपकेंद्र कार्यान्वित झाल्याने पुढील वर्षीपासून प्रवेशित विद्यार्थी संख्येत वाढ होण्याची अपेक्षा विद्यापीठ प्रशासनाने वर्तविली आहे.
नाशिकमध्ये कौशल्याधिष्ठीत अभ्यासक्रमातून रोजगार निर्मितीची संधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने मंदिर व्यवस्थापन (टेम्पल मॅनजेमेंट) हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु केला होता. प्रारंभी या अभ्यासक्रमास चांगला प्रतिसाद मिळाला होता. परंतु ऐन कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर यंदा या अभ्यासक्रमाला प्रतिसाद घटला आहे. या शिक्षणक्रमासाठी ६० प्रवेश क्षमता असताना, प्रत्यक्षात १४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. उपकेंद्रात उपलब्ध असलेल्या एमबीए अभ्यासक्रमाला मात्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे. या पूर्णवेळ पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या उपकेंद्रात १२० जागा उपलब्ध असताना, प्रत्यक्षात १०० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.
---
नवीन मंजुरीकडे लक्ष
उपकेंद्राच्या इमारत उद्घाटनावेळी पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी यांनी पैठणी, वाईन, टुरिझम यासह अन्य विविध कौशल्याधिष्ठीत अभ्यासक्रम उपकेंद्राच्या माध्यमातून सुरु करणार असल्याचे जाहीर केले होते. वर्ष २०२७-२८ मध्ये हे अभ्यासक्रम सुरु करण्याच्या अनुषंगाने आवश्यक मंजुरी प्रक्रिया तातडीने राबविण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.
---