esakal | Nashik : प्रभाग रचनेचा आराखडा तयार करण्यास सुरवात
sakal

बोलून बातमी शोधा

nashik

प्रभाग रचनेचा आराखडा तयार करण्यास सुरवात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : पुढील वर्षी होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीसाठी त्रिसदस्यीय प्रभाग रचना अस्तित्वात आली असून, राज्यपालांच्या अधिसूचनेनंतर बुधवार (ता.६) पासून महापालिकेत प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्यास सुरवात झाली. येत्या पंधरा दिवसांत कच्चा आराखडा राज्य निवडणूक आयोगाला सादर केला जाणार असून, प्रभाग रचनेसाठी सन २०११ ची जनगणना ग्राह्य धरली जाणार आहे. नाशिक महापालिकेत १२२ नगरसेवक असून, १२० नगरसेवकांसाठी ४० प्रभाग, दोन नगरसेवकांसाठी एक असे एकूण ४१ प्रभाग तयार होणार आहे.

जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात राज्यातील १८ महापालिकांच्या निवडणुका होणार आहे. त्यात नाशिक महापालिकेचादेखील समावेश आहे. महापालिकेच्या निवडणुकीचा पहिला टप्पा म्हणून प्रभाग रचना तयार केली जाणार आहे. महापालिका आयुक्तांना त्रिसदस्यीय प्रभागानुसार रचना करण्याच्या सूचना राज्य निवडणूक आयोगाने दिल्या. त्यानुसार महापालिकेत सन २०११ च्या जनगणनेनुसार प्रभाग रचना करण्यास सुरवात झाली. शहरात १४ लाख ९० हजार ५३ लोकसंख्या असून, त्यासाठी २८०७ प्रगणक गट तयार करण्यात आले आहेत. साधारण ७० प्रगणक गट एकत्र करून एक प्रभाग तयार होईल.

त्यानुसार शहरात तीन सदस्यांच्या ४० तर दोन सदस्यांचा एक, असे एकूण ४१ प्रभाग तयार होतील. प्रभाग रचनेचा आराखडा तयार करण्यासाठी महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीत महापालिकेची माहिती असलेले अधिकारी, प्रभाग रचना तयार करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेले अधिकारी, नगर रचनाकार, संगणक तज्ञ यांची नियुक्ती केली आहे.

वस्त्यांचे विभाजन टाळण्याच्या सूचना

प्रभाग रचना तयार करताना वस्त्यांचे विभाजन टाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अनुसूचित जाती, जमातीच्या वस्त्यांचे विभाजन करता येणार नाही. प्रभागातील दळणवळण, प्राथमिक आरोग्य सुविधा केंद्रे, दवाखाने, स्मशानभूमी, बाजार, पाणी पुरवठ्याच्या सोयी सुविधा, प्राथमिक शाळा, मैदाने आदी नागरिपयोगी जागांचा समावेश त्याचं प्रभागात करण्याच्या सूचना आहे.

रचनेमध्ये महत्त्वाचे

  1. प्रभाग रचना करताना उत्तरेकडून सुरवात.

  2. ईशान्य, पूर्व व पूर्वेकडून पश्चिमेकडे व शेवटी दक्षिण अशी रचना होईल.

  3. प्रभागांना उत्तर दिशेकडून क्रमांक.

  4. प्रभाग रचना करताना भौगोलिक सलगता राखणार.

  5. रचनेसाठी गुगल अर्थ नकाशाचा आधार.

  6. नकाशावर प्रगणक गटांच्या सीमांसाठी हिरवा रंग.

  7. जनगणना प्रभागांच्या सीमा, निळ्या रंगाने दर्शविणार.

  8. नवीन प्रभागांच्या हद्दीसाठी लाल रंग.

  9. प्रत्येक प्रभागाचा स्वतंत्र नकाशा.

loading image
go to top