भडगावात वाळूमाफियांचे घमासान
---
गोळीबारात वाळू व्यावसायिक नगरसेवक जखमी; ग्रामस्थांकडून धुळ्याच्या टोळीकडून गोळीबाराची पुष्टी
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ८ : वाळू व्यवसायातील स्पर्धेतून भडगाव येथे वाळूमाफियांमध्ये तुफान राडा होऊन गोळीबार झाला. ही घटना रविवारी (ता. ८) पहाटे घडली. जखमीला नाशिकला हलविले असून, हे प्रकरण मिटविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जखमीचे नाव लकीचंद पाटील असल्याचे सांगण्यात येते.
भडगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाळूची तस्करी आणि वाहतूक होते. पोलिसांच्या भागीदारीत चालणाऱ्या या व्यवसायात भडगावातील सत्ताधारी पुढाऱ्याचा समावेश आहे. गेल्या काही दिवसांपासून भडगावचे स्थानिक आणि धुळ्यातील वाळूमाफियांच्या गटात धुसफूस सुरू होती.
फोन करून बोलावले
रात्रभर गिरणा नदीपात्रातून वाळूचा उपसा आणि उत्खनन होत असल्याने पहाटे संबंधित वाळू व्यावसायिक पुढाऱ्याला बहाण्याने बोलावण्यात आले. भडगाव- कडगाव रोडवर वरधा कराब फाट्यावर वाद होऊन धुळ्याच्या टोळीकडून झालेल्या गोळीबारात स्थानिक वाळू व्यावसायिक गंभीर जखमी झाला आहे. घटना घडल्यावर वाळू व्यावसायिकांबरोबर रात्रपाळीच्या ड्यूटीवर असलेल्या पोलिसांनी जखमीला जळगावला न जाऊ देता थेट नाशिक येथील खासगी रुग्णालयात नेल्याचे सांगण्यात येत आहे.
कोट
घडल्या प्रकारात आमच्याकडे काही नोंद नाही किंवा तक्रार नाही. गावातूनच माहिती मिळाली, की जखमी स्थानिक रुग्णालयात गेला होता. तेथे त्याने अंधारात काहीतरी लागल्याचे सांगितले. मात्र, नंतर त्याला नाशिकला हलविण्यात आले. नाशिक पोलिस त्या रुग्णालयात जखमीचा जबाब घेण्यासाठी गेले होते. मात्र, त्याने जबाब दिलेला नाही.
- महेश टाक, प्रभारी निरीक्षक, भडगाव पेालिस ठाणे