पान चार सेकंड मेन
-----------------
07536
भगूर : नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत बोलताना नगराध्यक्षा प्रेरणा बलकवडे. शेजारी मुख्याधिकारी डॉ. सचिनकुमार पटेल व नगरसेवक, नगरसेविका
स्वातंत्र्यवीर सावरकरांना ''भारतरत्न'' देण्याच्या शिफारसीचा ठराव
घनकचरा नियम उपविधी, रस्ते कॉंक्रीटीकरणासह विकासकामांना मंजुरी
सकाळ वृत्तसेवा
देवळाली कॅम्प, ता. ६ : भगूरचे सुपुत्र स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना ''भारतरत्न'' हा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्याबाबत केंद्र व राज्य शासनाकडे शिफारस करणारा महत्त्वपूर्ण ठराव एकमुखाने मंजूर करण्यात आला. भगूर नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा नगराध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता.६) पालिका सभागृहात पार पडली.
सभेत भगूर शहराच्या विकासाशी निगडित विविध महत्त्वपूर्ण विषयांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्म भगूर येथे झाला असल्याने हा विषय संपूर्ण भगूरवासीयांच्या अस्मितेचा आहे, अशी भावना या वेळी व्यक्त करण्यात आली. याबरोबरच केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने लागू केलेल्या घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ नुसार भगूर नगरपरिषदेची स्वतःची उपविधी (बाय-लॉज) तयार करण्याबाबत विचारविनिमय झाला. यात कचऱ्याचे स्रोतस्थानी वर्गीकरण करणे, दररोज १०० किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण करणाऱ्यांवर नियम, वापरकर्ता शुल्क आणि नियमभंगासाठी दंडात्मक कारवाई अंतर्भूत असेल.यासह रस्त्यांचे कॉंक्रीटीकरणाचा निर्णय घेण्यात आला. नगरपरिषद हद्दीतील सि. स. नं. ९४५ च्या दक्षिण बाजूकडील गावठाण जागेला तसेच सि. स. नं. ५८१ ते ९६२/१ या दरम्यानच्या गावठाण जागेला सि. स. नंबर मिळण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला. जलशुद्धीकरण केंद्र येथे मंजूर असलेले पार्किंग शेड नगरपरिषद हद्दीतील योग्य व प्रशस्त ठिकाणी बांधण्याचा निर्णय झाला. पंपिंग स्टेशन रोडवरील पुलासाठी संरक्षक कठडे उभारणे आणि शहरातील अनधिकृत बॅनर व होर्डिंगमुळे होणारे विद्रुपीकरण रोखण्यासाठी जाहिरात संहिता लागू करण्यावर चर्चा झाली. शहरात विद्रुपीकरण होऊ दिले जाणार नाही, असे आश्वासन नगराध्यक्षांनी दिले. तसेच कर संकलनावरही सकारात्मक चर्चा झाली.
सभेला मुख्याधिकारी डॉ. सचिनकुमार पटेल, उपनगराध्यक्ष प्रसाद आडके व नगरसेवक विशाल बलकवडे, दीपक बलकवडे, काकासाहेब देशमुख, शंकर करंजकर, सुधेश वालझाडे, मृत्यूंजय कापसे, बबलू जाधव, सागर चंद्रमोरे, अमोल इंदारखे, तसेच नगरसेविका कांता गायकवाड, कापसाबाई साळवे, जयश्री देशमुख, सुजाता शिरसाठ, सुचित्रा बुरके, लता थापेकर, अश्विनी भवर, सोनाली सोनावणे, नगर अभियंता सिद्धेश मुळे, नगररचना कर अधिकारी रोशन उगले, संगणक अभियंता रोहित सुरसे, लेखापाल निखील हांडोरे, आस्थापना प्रमुख गीतांजली मराडे, कर अधिकारी सोनाली शिरसाठ उपस्थित होते.