NSK26H32718
जळगाव : भंगार बाजार येथे महापालिकेच्या जागेवर जाहीर नोटीस लावताना महापालिकेचे पथक.
.......
भंगार बाजारात महापालिकेची जाहीर नोटीस
स्थगितीवाढीची विनंती न्यायालयाकडून फेटाळली; २१ ऑक्टोबरला पुढील सुनावणी
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १६ : मेहरुण येथील भंगार बाजाराच्या जागेवर अनधिकृतपणे व्यापार करणे, वास्तव्य करणे किंवा साहित्य ठेवण्याबाबत महापालिकेने शुक्रवारी (ता. १६) जाहीर नोटीसचे बॅनर लावले. दरम्यान, या जागेवरील निष्कासन कारवाईला अंतरिम संरक्षण देण्याची मुदत वाढवून मिळावी, यासाठी स्टील मार्केट असोसिएशनने उच्च न्यायालयात केलेली विनंती फेटाळण्यात आली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २१ ऑक्टोबरला होणार आहे.
मेहरुण येथील सिटी सर्व्हे क्रमांक २९ मधील जागा तत्कालीन नगरपालिकेने व्यावसायिक वापरासाठी भाडेतत्त्वावर दिली होती. या जागेची भाडेपट्टा मुदत ९९ वर्षांपर्यंत वाढविण्याचा ठराव करण्यात आला होता. मात्र, या मुदतवाढीसाठी आवश्यक शासन मान्यता मिळाल्याचे अभिलेखावर दिसून न आल्याने महापालिकेच्या महासभेने हा ठराव रद्द केला. त्यानंतर संबंधित जागा रिकामी करून महापालिकेच्या ताब्यात देण्याचे आदेश २०२१ मध्ये पारित केले होते. या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी महापालिकेने ३० सप्टेंबरला निष्कासन कारवाई सुरू करून बहुतांश अनधिकृत बांधकामे हटविली. या कारवाईविरोधात स्टील मार्केट असोसिएशनने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. न्यायालयाने उर्वरित कारवाई १४ ऑक्टोबरपर्यंत थांबविण्याचे आदेश दिले होते.
न्यायालयीन स्थगिती उठवली
दरम्यान, असोसिएशनने १५ ऑक्टोबरला स्थगितीला मुदतवाढ देण्याची मागणी केली. मात्र, न्यायालयाने ती फेटाळली. त्यानंतर महापालिकेने जागेवर अनधिकृतपणे बसणे, व्यापार करणे, तसेच साहित्य किंवा बांधकाम ठेवण्याबाबत संबंधितांना सूचित करणारे बॅनर लावले. जागेचा ताबा मिळविण्यासाठी महापालिकेकडून कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
चौकट
नोटीस फलक लावताना वाद
महापालिकेचे मालमत्ता मिळकत विभागाचे अधिकारी, तसेच अतिक्रमण निर्मूलन विभागाचे उपायुक्त पंकज गोसावी, अधीक्षक संजय ठाकूर यांनी नोटिशीचा फलक लावण्यासाठी भंगार बाजारात गेले. मात्र, भंगार व्यवसायिकांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना विरोध करून शाब्दीक वाद घातला. तसेच न्यायालयाच्या निकाल येत नाही, तोपर्यंत नोटीस लावू नये, अशी भूमिका घेतली होती.