esakal | जाऊबाईंनी नाकारलेल्या तिकीटावर विजय; आज थेट केंद्रीय मंत्रिपद!
sakal

बोलून बातमी शोधा

bharati pawar

जाऊबाईंनी नाकारलेल्या तिकीटावर विजय; आज थेट केंद्रीय मंत्रिपद

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

नाशिक : सतत समाजाच्या संपर्कात, प्रवाहात राहिले तर राजकारणात अशक्य काहीच नसते. कधी-कधी तर ध्यानीमनी नसतानाही छप्पर फाडके मिळते, तेही राजकारणातच. यंदा नाशिक जिल्ह्याच्या पदरात प्रथमच केंद्रीय मंत्रिपद पडले असून, त्यामुळे जिल्हावासीयांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे, त्यांच्या जाऊबाईंनी नाकारलेल्या भाजपच्या तिकिटावर त्या निवडून आल्या होत्या. त्या आता आपल्या कर्तृत्वाने थेट केंद्रीय मंत्रिपदापर्यंत पोहोचल्या आहेत. दिंडोरीच्या खासदार डॉ. भारती पवार यांचा जिल्हा परिषद सदस्या ते केंद्रीय मंत्रिपदापर्यंतचा प्रवास थक्क करणारा असाच आहे. (bharti-pawar-journey-to-minister-nashik-marathi-news)

राजकीय कुटुंबकलह व जाऊबाई जोरातचे राजकारण

भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून त्यांची शिफारस झाल्याचे बोलले जाते. डॉ. पवार यांना सासरे ए. टी. पवार यांच्याकडूनच राजकीय बाळकडू मिळाले. दोन वेळा जिल्हा परिषद सदस्यत्व भूषविणाऱ्या डॉ. पवार या तशा मितभाषी अन्‌ अभ्यासूही आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून अपयश आल्यानंतरही त्या मतदारसंघातील समाजकारणात सक्रिय राहिल्या. ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीची उमेदवारी माजी आमदार धनराज महाले यांच्या पारड्यात पडली. तीनदा खासदार राहिलेले हरिश्‍चंद्र चव्हाण यांच्या उमेदावारीला भाजपने कात्री लावली. अशा नाट्यपूर्ण घडामोडींनंतर डॉ. पवार यांना भाजपची उमेदवारी मिळाली. अर्थात, राष्ट्रवादीने उमेदवार बदलण्यात पवार घराण्यातील राजकीय कुटुंबकलह व जाऊबाई जोरातचे राजकारण कारणीभूत होते, असे बोलले जाते. पंतप्रधान मोदी लाट व डॉ. पवार यांच्याविषयी मतदारसंघात राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारल्याने सहानुभूती यामुळे तब्बल पावणेदोन लाख मतांनी त्यांच्या गळ्यात खासदारकीची माळ पडली. राजकारणात कर्तृत्वाबरोबर नशिबाची जोड लागते. बहुधा राष्ट्रवादीने डॉ. पवार यांची उमेदवारी कापत भाजपचा मार्ग दाखवत खासदारकी अन्‌ मंत्रिपद अप्रत्यक्षरीत्या बहाल केले. कारण, दोन वर्षांपूर्वीच्या मोदी लाट व पिंपळगावची टर्निंग पॉइंट ठरलेली ऐतिहासिक सभा भाजपचाच उमेदवार दिंडोरी मतदारसंघातून विजयी होणार, हे निश्‍चि‍त होते.

पक्षसंघटन व भाजपच्या उपक्रमाकडे कानाडोळा करण्याची घोडचूक व सर्वपक्षीय संबंध असल्याचा देखावा उमेदवारी कापली गेल्याने माजी खासदार चव्हाण यांना भलताच महागात पडला. तेच हेरत खासदार डॉ. पवार यांनी गेल्या सव्वादोन वर्षांत भाजपच्या प्रत्येक उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला. केंद्र सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोचविल्या. कोरोना काळात उद्‌भवलेल्या द्राक्ष उत्पादकांच्या समस्या केंद्र सरकारपर्यंत पोचविल्या. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांशी चांगले संबंध राखले. त्यातूनच त्यांचा पक्षश्रेष्ठींच्या गुडबुकमध्ये समावेश झाला अन्‌ आश्‍चर्यकारकरीत्या केंद्रीय मंत्रिपदावर त्या विराजमान झाल्या.

loading image