Nashik News: वारी हीच आम्हासाठी दसरा अन्‌ दिवाळी : भास्कर पवारांच्या फेटेधारी दिंडीने वेधले लक्ष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sant Nivruttinath Maharaj yatrotsav

Nashik News: वारी हीच आम्हासाठी दसरा अन्‌ दिवाळी : भास्कर पवारांच्या फेटेधारी दिंडीने वेधले लक्ष

Nashik News : ‘वारी हीच आमच्यासाठी दसरा अन दिवाळीही... याचा आनंद कसा सांगू’ असे सुरगाण्यासारख्या आदिवासी भागातून तब्बल दीडशे महिलांसह दिंडी घेऊन आलेल्या भास्कर पवार यांनी व्यक्त केला.

या दिंडीत सहभागी महिलांसह सर्वांच्या डोईवरील फेट्यांकडे त्र्यंबकनगरीत हजारोंच्या संख्येने जमलेल्या वारकऱ्यांचे लक्ष वेधले.

कोरोनानंतर निर्बंधमुक्त वातावरणात प्रथमच होत असलेल्या सोहळ्यासाठी यंदा दिंड्यांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. (Bhaskar Pawar Fettedhari Dindi of sant nivruttinath yatrotsav caught attention Nashik News)

संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यात्रोत्सवासाठी सायंकाळी पाचपर्यंत दोनशे नव्वद दिंड्यांची नोंद झाली होती.

या दिंड्यांचे संस्थानचे अध्यक्ष नीलेश गाढवे पाटील, सचिव ॲड. सोमनाथ घोटेकर, विश्‍वस्त प्रा. अमर ठोंबरे आदींच्या उपस्थितीत स्वागत करण्यात आले. यावेळी दिंडीतील पालखी प्रमुखांना निवृत्तीनाथ महाराज यांची प्रतिमा, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

फेटेधारी तरुण प्रमुख आकर्षण

सुरगाण्यासारख्या आदिवासी भागातून आलेली भास्कर पवार यांची फेटेधारी दिंडी लक्षवेधी ठरली. या दिंडीत सहभागी दीडशेपेक्षा अधिक महिलांसह ज्येष्ठ, फेटेधारी तरुण प्रमुख आकर्षण ठरले.

कोरोना महामारीपासून आदिवासी बांधवांना सुरक्षित ठेवल्याबद्दल यंदा फेटे बांधूनच माऊलीच्या दर्शनासाठी आल्याचे श्री. पवार यांनी सांगितले.

आमच्यासाठी वारी हीच दसरा अन्‌ दिवाळी असल्याचे सांगत श्री. पवार यांनी बंदीस्त जागेत नव्हे तर खुल्या जागेत राहुट्या बांधून वारीने मुक्कामाला पसंती दिल्याचे सांगितले. वारीत बाहेरच्या कीर्तनकारांना न बोलविता आमचेच विद्यार्थी तयार करत असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा : आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....

हेही वाचा: शाकंभरी यात्रेत Indian Chocolateला पसंती! मंदाणेत यात्रेकरूंना आकर्षित करते लालेलाल गोडशेव

पालकमंत्री भूसेंच्या हस्ते पूजा

जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते उद्या (ता.१८) पहाटे चार वाजता महापूजा होईल तर मध्यरात्री अध्यक्ष व विश्‍वस्तांच्या हस्ते देवस्थानातर्फे महापूजा होणार आहे. यात्रोत्सवासाठी जवळपास दोन लाख वारकरी भाविक त्र्यंबकनगरीत दाखल होण्याची चिन्हे आहेत.

"अतिशय कमी वेळेत मंदिराचा जिर्णोद्धार पूर्ण झाला आहे. मोठ्या संख्येने दाखल झालेल्या वारकऱ्यांसाठी स्वच्छतागृहांसह अन्य यंत्रणा उभारण्यात आली आहे."
- नीलेश गाढवे, अध्यक्ष, संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ ट्रस्ट

"प्रत्येक दिंडीतील प्रमुखांना माऊलीच्या प्रतिमेसह शाल, श्रीफळ, छोटी गूळाची भेली देऊन सत्कार करत आहोत. येथील वातावरणात मोठा भक्तिभाव दिसून येतो."
- ॲड. सोमनाथ घोटेकर, सचिव

"अडचणीच्या काळातही वारकऱ्यांची माऊलीवरील निष्ठा तसूभरही कमी झालेली नाही, हेच मोठ्या संख्येने आलेल्या दिंड्यांमधील संख्येवरून लक्षात येते."- प्रा. अमर ठोंबरे, विश्‍वस्त

हेही वाचा: Dhule News : स्वावलंबनाचा लामकानी शेतकरी पॅटर्न; गटशेतीचा लाभ