टुडे १, मेन फिचर
(एसटी बसचे संग्रहित छायाचित्र वापरावे)
---
भाऊबीजेच्या गर्दीने एसटीची भरली तिजोरी
जळगाव विभागाची सव्वातीन लाख किलोमीटर धाव; सवलतींसह दोन कोटींवर उत्पन्न
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १२ : भाऊबीजेच्या निमित्ताने भाऊ-बहिणींच्या भेटीगाठींसाठी निघालेल्या प्रवाशांमुळे जळगावसह विभागातील एसटी बसस्थानके प्रवाशांच्या गर्दीने गजबजून गेली होती. सकाळपासूनच बसस्थानकांवर प्रवाशांची लगबग, गाड्यांमध्ये जागा मिळविण्यासाठी धावपळ आणि फलाटांवर लागलेल्या बसेसचे चित्र पाहायला मिळाले. या वाढलेल्या गर्दीचे नियोजन करत जळगाव एसटी विभागाने भाऊबीजेच्या दिवशी सवलतींसह २ कोटी ९ लाख रुपयांचे उत्पन्न मिळविले. राज्य परिवहन महामंडळाच्या कामगिरीत सर्वाधिक प्रवासी आणि महिला प्रवाशांच्या वाहतुकीत जळगाव विभागाने राज्यात अव्वल स्थान पटकावले.
दिवाळीचा सण आणि भाऊबीजेच्या निमित्ताने माहेरी जाणाऱ्या महिला, बहिणींच्या भेटीसाठी निघालेले भाऊ तसेच सुटीनंतर परतीच्या प्रवासाला लागलेल्या नागरिकांची मोठी गर्दी एसटी बसस्थानकांवर होती. प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी उपलब्ध बसेस मार्गस्थ ठेवण्यावर विभागाने भर दिला. चालक-वाहकांच्या नियोजनबद्ध ड्युट्या आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या समन्वयातून प्रवासी वाहतुकीचा मोठा भार यशस्वीपणे सांभाळण्यात आला.
महिला प्रवाशांचा सर्वाधिक सहभाग
या दिवशी एकूण २ लाख ३३ हजार ३८५ प्रवाशांनी एसटीने प्रवास केला. त्यात १ लाख १८ हजार महिला प्रवाशांचा समावेश होता. ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांनीही मोठ्या प्रमाणावर एसटीला पसंती दिली. प्रवासी संख्येतील ही कामगिरी जळगाव विभागासाठी महत्त्वपूर्ण ठरली.
(पट्टीचा ग्राफ करावा)
भाऊबीजेच्या दिवशी जळगाव विभागाची कामगिरी
- एकूण प्रवासी : २,३३,३८५
- महिला प्रवासी : १,१८,०००
- ज्येष्ठ नागरिक : ३,७२८
- अमृत ज्येष्ठ नागरिक : २४,६८६
- एकूण वाहतूक : ३.२५ लाख किलोमीटर
- सवलती वगळून उत्पन्न : १.२४ कोटी रुपये
- सवलतींसह उत्पन्न : २.०९ कोटी रुपये
---
राज्यातील क्रमवारी जळगाव विभाग
- सर्वाधिक प्रवासी वाहतूक : प्रथम
- महिला प्रवासी वाहतूक : प्रथम
- वाहतूक किलोमीटर : द्वितीय
- उत्पन्न : तृतीय
---
कोट
सर्व बसेस मार्गस्थ ठेवून उपलब्ध मनुष्यबळाचा नियोजनबद्ध वापर करण्यात आला. चालक-वाहकांचे कर्तव्यनिष्ठ योगदान आणि सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या समन्वयपूर्ण प्रयत्नांमुळे ही कामगिरी साध्य झाली. ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे.
- प्रज्ञेश बोरसे,
विभाग नियंत्रक, जळगाव एसटी विभाग.