एक शून्य शून्य
....
जमीर शेख (पोलिस निरीक्षक, गंगापूर पोलिस ठाणे : फोटो H33456)
राजकीय सुडापोटी दिली नगरसेवकाच्या हत्येची सुपारी
भिवंडी शहर हद्दीतील कुंभारवाडा पोलिस ठाण्यातील तत्कालीन पोलिस निरीक्षक जमीर शेख यांनी गस्ती दरम्यान दोन सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून जिवंत काडतुसांसह गावठी कट्टा पोलिसांच्या हाती लागला. चौकशीनंतर या दोघांना शहरातील एका नगरसेवकांचा खून करण्यासाठी सुपारी देण्यात आल्याची माहिती समोर आली.
- नरेश हाळणोर
भिवंडी महापालिकेची २०१७ मध्ये निवडणूक झाली होती. भिवंडी शहर हद्दीतील कुंभारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हेशोध पथकाचे प्रमुख म्हणून पोलिस निरीक्षक जमीर शेख यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. जुलै २०१८ मध्ये एका रात्री शेख हे रात्रपाळीच्या ड्यूटीवर होते. कुंभारवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग सुरू असताना मध्यरात्रीच्या सुमारास रस्त्यालगत दोन संशयित युवक पोलिसांची गाडी पाहून पळाले आणि अंधारात जाऊन लपले. ही बाब शेख यांच्या लक्षात येताच त्यांनी गाडीतील पोलिस अंमलदारांना त्या दोघांचा शोध घेण्यास सांगितले. दोघांना शिताफीने ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. शेख यांनी दोघांची अंगझडती घेतली. त्या वेळी एकाच्या पाठीला काहीही टणक वस्तू असल्याचे लक्षात आले. त्यांनी त्याच्या कमरेची ती वस्तू बाहेर काढली असता, दुसरे-तिसरे काही नाही तर गावठी कट्टा हाती लागला. तो जिवंत काडतुसांनी लोड केलेला होता. दोघांकडे चौकशी केली असता ते काहीही सांगत नसल्याने त्यांना पोलिस गाडीत बसवले आणि कुंभारवाडा पोलिस ठाण्यात आणण्यात आले. पोलिस ठाण्यातील अंमलदारांनी दोघांकडे चौकशी केली असता, त्यांनी पुन्हा उडवाउडवीची उत्तरे दिली.
माजी नगरसेवकाच्या हत्त्येचा कट
दोघे संशयित भिवंडी परिसरातलेच असून, त्यांच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले. शेख यांनी दोघांना पोलिसी खाक्या दाखविताना त्यांच्या तोंडून ‘सच’ बाहेर पडू लागले. दोघेही सराईत गुन्हेगार होते. ते भिवंडीतील एका माजी नगरसेवक सय्यद (नाव बदलले आहे) याचा खातमा करण्यासाठी आले होते. त्यांना तशी सुपारीच देण्यात आली होती. हे ऐकून पोलिस निरीक्षक शेख यांना धक्काच बसला. ही माहिती त्यांनी तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. त्यानुसार, तपास सुरू झाला. सय्यद नावाचा एक माजी नगरसेवक कुंभारवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहत असल्याची माहिती शेख यांच्या हाती लागली. दोघे संशयित गेल्या काही दिवसांपासून सय्यद याच्यावर पाळत ठेवून होते. संधी मिळताच ते त्याच्यावर गावठी कट्ट्यातून हल्ला करणार होते अन् त्याचा खातमा करणार होते. त्या साठी ते गावठी कट्टा कायम लोड करूनच फिरत होते. पण त्यांना सय्यद त्यांच्या टप्प्यात सापडत नव्हता. त्यामुळे ते संधी शोधत होते. मात्र त्यांना कोणी सुपारी दिली याची माहिती मात्र ते देत नव्हते. त्यासाठी शेख यांनी ‘सच’चा पट्टाही चालवून पाहिला.
तांत्रिक विश्लेषण अन्...
शेख यांनी दोघांचे मोबाईल जप्त केले होते. या मोबाइलमधील डाटा व तांत्रिक विश्लेषण सुरू केले होता. सायबर सेलने त्या आधारे महत्त्वाची माहिती शेख यांना पुरविली. या दाेघांना वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावर ठराविक वेळेला संपर्क साधले जात होते. मोबाईलवरून संपर्क साधणारेही भिवंडी शहरातीलच होते. शेख यांनी या मोबाइलच्या तांत्रिक विश्लेषणावरून शोध सुरू केला. आणखी दोघांना संशयावरून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असता, त्यातील एकाची मात्र चौकशीमध्ये बोबडी वळाली. त्याच्या चेहऱ्यावर हावभाव अन् संशयास्पद देहबोलीवरून शेख यांनी जे ओळखायचे ते ओळखले. त्याला बाजूला घेतले. सुरुवातीला त्याने गावठी कट्ट्यासह अटक केलेल्या दोघांना ओळखण्यास नकार दिला होता. त्यामुळे शेख यांनी त्यालाही ‘सच’चा पट्ट्यातून पोलिसी खाक्या दाखविला. प्रारंभी त्याने शेख यांचाच घाम काढला पण एका टप्प्यावर मात्र तो फुटला.
पाच लाखांची सुपारी
भिवंडीतील एका राजकीय पक्षाचा माजी नगरसेवक असलेला सय्यद २०१७ च्या महापालिकेच्या निवडणुकीत पराभूत झाला होता. पण त्याच्यामुळे आणखी एक उमेदवार पराभूत झाला होता. आणि तोही माजी उपमहापौर होता. मोहम्मद उस्मान (नाव बदलले आहे) त्याचे नाव. निवडणुकीच्या काळात मोहम्मद अन् सय्यद यांच्यात कमालीची स्पर्धा रंगली होती. त्यातच दोघांचीही पार्श्वभूमी गुन्हेगारीचीच होती. दोघेही मूळचे उत्तरप्रदेशचे होते. निवडणुकीच्या प्रचारात दोघांकडून एकमेकांवर चिखलफेक झाली. सय्यद याने मोहम्मदला पराभूत करण्यासाठी कोणतीही कसर सोडली नव्हती. परिणाम असा झाला की उपमहापौर पदावर असलेल्या मोहम्मदला पराभवाचे तोंड पहावे लागले. त्यास सय्यदच कारणीभूत असल्याने त्याचा राग मोहम्मदच्या मनात होताच. त्यासाठीच तो सय्यदवर सूड उगविण्यासाठी संधी शोधत होता. अखेर त्याने सय्यदचा खातमा करण्यासाठी भिवंडीतल्याच दोघा सराईत गुन्हेगारांना एका तिऱ्हाईतामार्फत सुपारी दिली. त्यासाठी त्याने पाच लाखांची रोकडही दिली.
गावठी कट्टाही तिऱ्हाईताच्याच माध्यमातून त्या दोघांना मिळाला होता. शेख यांनी तपासाची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. माजी उपमहापौर राहिलेल्या मोहम्मद उस्मान याला अटक करण्याची परवानगी मागितली. त्यासाठी तांत्रिक पुराव्यांसह अटक केलेल्या तिघांनी दिलेल्या जबाबाचीही माहिती शेख यांनी वरिष्ठांना दिली. प्रकरण संवेदनशिल असल्याने मोठ्या फौजफाट्यासह अन् गोपनीयरित्या मोहम्मदला चौकशीसाठी बोलविण्यात येऊन शेख यांनी अटक केली. मोहम्मदच्या अटकेने भिवंडीत एकच खळबळ उडाली. पण शेख यांनी मोठ्या शिताफीने या गुन्ह्यांची उकल केली. या गुन्ह्याच्या तपासाबद्दल शेख यांना पोलिस महासंचालकांकडून विशेष कामगिरीबद्दल पदकही देण्यात आले. सध्या या प्रकरणाचा खटला न्यायप्रविष्ट आहे.