YEO26B27453
येवला : येथील श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करताना ज्येष्ठ सदस्य.
-------------
श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाची सर्वानुमते निवड
-----------
अध्यक्षपदी भोलानाथ लोणारी ः वार्षिक सभेत उदावंत, वडे, पोंदे व वाणी यांची निवड
-----------
सकाळ वृत्तसेवा
येवला, ता. ९ : ज्येष्ठ नागरिकांच्या अडीअडचणी समजून घेत त्यांना आनंदी,उत्साही आणि सामाजिकदृष्ट्या सक्रिय ठेवण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन एकजुटीने काम करणार असल्याची ग्वाही नवनिर्वाचित अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष भोलानाथ लोणारी यांनी दिली.
येथील श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पुढील तीन वर्षांसाठी अध्यक्षपदी श्री. लोणारी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. नवीन कार्यकारिणीचीही घोषणा करण्यात आली. संघाच्या विरंगुळा केंद्रात झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी राजेंद्र आहेर होते. प्रारंभी विजय पोंदे व राजेंद्र आहेर यांनी वार्षिक अहवाल सभासदांसमोर सादर केला. ऑक्टोबरमध्ये वाढदिवस असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा पुणेरी पगडी,शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
सभेत पुढील तीन वर्षांसाठी नवीन कार्यकारिणी निवडीची प्रक्रिया पार पडली. अध्यक्षपदासाठी माजी नगराध्यक्ष भोलानाथ लोणारी यांचे नाव राजेंद्र वडे यांनी सुचविले. सामाजिक कार्यकर्ते नारायणमामा शिंदे, सुदाम दाणे ,किशोर कुमावत व नारायण रायजादे यांनी अनुमोदन दिले. उपस्थित सभासदांनी एकमताने मान्यता दिल्याने भोलानाथ लोणारी यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
तसेच नवीन कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी विलास उदावंत, सचिवपदी राजेंद्र वडे, तर उपसचिवपदी विजय पोंदे व भिका वाणी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
अध्यक्ष श्री. लोणारी यांचा संघातर्फे राजेंद्र आहेर यांनी सत्कार केला. जनकल्याण सेवा समितीतर्फे नारायणमामा शिंदे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. आतषबाजी करून निवडीचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. नवनिर्वाचित अध्यक्ष लोणारी यांनी ज्येष्ठ नागरिक संघाचे काम अधिक प्रभावीपणे पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला. ज्येष्ठांच्या अनुभवाला, विचारांना आणि भावनांना प्राधान्य देत संघाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व पदाधिकारी व सभासदांनी परस्पर समन्वय आणि एकजुटीने काम करून संघाचे कार्य अधिक व्यापक करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
-----------------