पान-३ मेन
फोटो -16244
मालेगाव : अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण साळुंखे यांना निवेदन देताना भुईकोटप्रेमी नागरिक.
-----
भुईकोट किल्ल्याजवळचे अतिक्रमण हटवावे
याचिकेवर जलद गतीने निर्णय व्हावा; नागरिकांचे अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
मालेगाव, ता. १६ : येथील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यामधील अतिक्रमणाबाबत उच्च न्यायालयातील दाखल याचिकांवर जलद गतीने सुनावणी घेण्यासाठी पाठपुरावा करावा. किल्ल्यातील वाणिज्य अतिक्रमण तत्काळ हटवावे, अशी मागणी भुईकोटप्रेमी नागरिकांनी अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण साळुंखे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
भुईकोट किल्ल्याचे सध्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. दर्शनी भागातील नूतनीकरणाचे काम करत असताना अजूनपर्यंत अतिक्रमण हटविण्यात आलेले नाही. गड व किल्ल्यावरील अतिक्रमण हटविण्याबाबत शासनाने धोरण निश्चित करून तत्काळ अतिक्रमण काढण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम निश्चित केला होता. त्या अनुषंगाने येथे कारवाई झाली नाही. भुईकोट किल्ल्यामधील रहिवासी अतिक्रमणबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. किल्ल्याच्या चारही बाजूंना मोठ्या प्रमाणावर वाणिज्य व्यापारी दुकानांचे अतिक्रमण आहे. तसेच सभामंडळ, कम्युनिटी हॉलसारखे अतिक्रमण महापालिकेने केले आहे. जे काढण्यास कोणत्याही प्रकारचा कायदेशीर अडथळा असू शकत नाही.
उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर प्रशासनातर्फे जलद गतीने निर्णय व्हावा, यासाठी पाठपुरावा व अपेक्षित कारवाई होणे गरजेचे होते. रहिवासी अतिक्रमणधारकांना पर्यायी जागा उपलब्ध करून देत ते अतिक्रमण तत्काळ हटविणे गरजेचे होते. परंतु प्रशासन राजकीय दबावात काम करत असून, ऐतिहासिक वास्तूचे जतन संवर्धन करण्यात व अतिक्रमण मुक्त करण्यात चालढकल करीत आहेत. किल्ल्यामधील वाणिज्य व्यापारी सभामंडळ कम्युनिटी हॉलसारखे अतिक्रमण तत्काळ काढावे, रहिवासी घरांचे अतिक्रमण काढम्यासाठी उच्च न्यायालयात दाखल मनाई हुकमावर जलद गतीने निर्णय व्हावा, यासाठी पाठपुरावा करावा, अशी मागणी निखिल पवार, भरत पाटील, हेमंत जाधव, हरीदादा निकम, नीलेश बाविस्कर, डॉ. वीरेंद्र चव्हाण, भगवान जाट, डॉ. संतोष पाटील, किशोर जाधव, नीलेश पाटील, अनिल जाधव, अर्जुन भाटी, किशोर शिंदे, दीपक बच्छाव, रमेश सकट आदींनी केली आहे.