(शहर - जिल्हा कॉमन)
---
सेकंड मेन
NSK26H33960
भुसावळ : येथे भोरगाव लेवा पंचायतीतर्फे आयोजित वधू-वर परिचय व पुरस्कार वितरण सोहळ्यात सुचीचे प्रकाशन करताना माजी मंत्री एकनाथ खडसे. सोबत मंत्री संजय सावकारे, डॉ. उल्हास पाटील, शिरीष चौधरी, कुटुंब नायक ललित पाटील आदी.
-----
समाजातील वाढत्या घटस्फोटाविरुद्ध जागृती हवी
उपशीर्षक
एकनाथ खडसे; भोरगाव लेवा पंचायतीच्या मेळाव्यास प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
भुसावळ, ता. ३० : भोरगाव लेवा पंचायतीचे समाजातील हुंडा पद्धतीविरोधी जनजागृतीचे काम प्रभावी आहे. परंतु, अलिकडे वाढत्या घटस्फोटांची समस्या गंभीर बनली आहे.. त्यावर सजगपणे काम करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री तथा ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनी केले.
भोरगाव लेवा पंचायत, विभाग भुसावळतर्फे आयोजित विवाह व पुनर्विवाह इच्छुक वधू-वर परिचय मेळावा, सूची प्रकाशन आणि पुरस्कार वितरण सोहळा नुकताच उत्साहात पार पडला, त्यात श्री. खडसे बोलत होते.
तिघा नेत्यांना ‘जीवन गौरव’
या सोहळ्यात माजी मंत्री एकनाथराव खडसे, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी यांना ‘लेवा शिरोमणी समाजरत्न जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुटुंबनायक ललित पाटील होते. तर प्रमुख अतिथी म्हणून वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, जळगावचे आमदार सुरेश भोळे, भुसावळच्या नगराध्यक्षा शैलजा नारखेडे, माजी नगराध्यक्ष रमण भोळे, भोरगाव लेवा पंचायत भुसावळ विभागाचे प्रमुख सुहास चौधरी, संचालिका व समुपदेशक आरती चौधरी आणि सचिव सुभाष भंगाळे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरवातीला दिव्यांग राशी पाटील या मुलीने हात नसतानाही जिभेच्या टोकाने गणेशवंदना सादर केली. तिच्या या विलक्षण सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. मान्यवरांच्या हस्ते विवाह व पुनर्विवाह इच्छुक वधू-वरांच्या सूचीचे प्रकाशन करण्यात आले.
मंत्री श्री. सावकारे यांनी भोरगाव लेवा पंचायत ही सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी सदैव तत्पर असलेली उत्कृष्ट संस्था असल्याचे गौरवोद्गार काढले. माजी आमदार शिरीष चौधरी यांनी पंचायतीच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. मिळालेला पुरस्कार हा आपल्या कार्यात सहकार्य करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांना अर्पण करत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
चौकट
सत्कार अन् पुस्तक प्रकाशन
डॉ. उल्हास पाटील यांनी हा पुरस्कार म्हणजे समाजाने दिलेले प्रेम आणि आपुलकी असल्याचे सांगितले. आम्ही तिघेही वेगवेगळ्या राजकीय पक्षांत असलो, तरी समाजाच्या दृष्टीने आमची मुळे एकच आहेत, असे त्यांनी नमूद केले. या वेळी १०० वेळा ‘शेगाव वारी’ पूर्ण केल्याबद्दल मामा पाचपांडे यांचाही सत्कार करण्यात आला. तसेच भागवत खाचणे लिखित ‘जीवनोद्धार’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
---------