शहर-जिल्हा टुडे ३
-----
NSK26H31941
भुसावळ : भोरगाव लेवा पंचायतच्या भुसावळ शाखेतर्फे वधू-वर परिचय मेळावा व जीवन गौरव पुरस्कार सोहळ्यासंदर्भात झालेल्या बैठकीस उपस्थित पदाधिकारी.
-----
भोरगाव लेवा पंचायततर्फे भव्य परिचय मेळावा
-----
भुसावळात २५ला आयोजन; खडसे, डॉ. पाटील, चौधरींना ‘जीवनगौरव’
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ११ : भोरगाव लेवा पंचायतच्या भुसावळ शाखेतर्फे विधवा, विधूर, घटस्फोटित व प्रौढ विवाह इच्छुक वधू-वरांसाठी भव्य परिचय मेळावा व वधू-वर सूची प्रकाशन सोहळा येत्या २५ ऑक्टोबरला आयोजित करण्यात आला आहे. भुसावळच्या प्रभाकर हॉलमध्ये सकाळी दहाला हा सोहळा होईल.
विवाहसंस्थेला बळकटी देण्याबरोबरच विविध कारणांमुळे विवाहापासून वंचित राहिलेल्या व्यक्तींना नव्याने संसाराची संधी मिळावी, त्यांना योग्य जीवनसाथी निवडण्यासाठी मंच उपलब्ध व्हावा, यासाठी भोरगाव लेवा पंचायततर्फे हा उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहे. यंदाच्या मेळाव्यात विवाह व पुनर्विवाह इच्छुक वधू-वरांची सूची प्रकाशित करण्यात येणार असून, सहभागी वधू-वरांना एकमेकांशी परिचय साधण्याची संधी मिळणार आहे.
तिघांना जीवनगौरव पुरस्कार
समाज व सार्वजनिक जीवनात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणारे लोकनेते माजी मंत्री, आमदार एकनाथ खडसे, माजी खासदार व शिक्षणमहर्षी डॉ. उल्हास पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी यांचा ‘लेवा शिरोमणी समाजरत्न जीवनगौरव पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
उपस्थितीबाबत आवाहन
या कार्यक्रमाला केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे, ह.भ.प. भरत महाराज बेळीकर यांच्यासह समाजातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती भोरगाव लेवा पंचायत भुसावळ विभागाचे प्रमुख सुहास चौधरी यांनी दिली. समाजातील विवाह इच्छुक वधू-वरांनी व त्यांच्या पालकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पंचायततर्फे करण्यात आले आहे.