ॲंकर
भुसावळ परिसर पानासाठी
--------
BSW26B12194
भुसावळ : स्नेहयात्री प्रतिष्ठान संचलित रिडर्स क्लबतर्फे विद्यार्थ्यांना दिवाळी अंक व पुस्तक वाटपप्रसंगी वीरेंद्र पाटील, प्रा. गिरीश कुलकर्णी, संजय यावलकर, उज्वल सराफ आदी.
----------------
भुसावळात विद्यार्थ्यांना दिवाळी अंकासह पुस्तकवाटप
------
पालकांकडून कौतुक; वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी रिडर्स क्लबचा उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
भुसावळ, ता.३ : येथील स्नेहयात्री प्रतिष्ठान संचलित भुसावळ रिडर्स क्लबतर्फे विद्यार्थ्यांना दिवाळी अंक व पुस्तकांचे वाटप नुकतेच करण्यात आले. विद्यार्थ्यांनी मोबाईलपासून दूर जाऊन त्यांच्यात वाचनसंस्कृती रुजावी, म्हणून हा उपक्रम हाती घेण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. या उपक्रमाचे पालकांनीही कौतुक केले.
या वर्षांच्या पहिल्या महिन्यातील रविवारपासून दर रविवारी रिडर्स क्लबची साप्ताहिक बैठक अर्थात ‘वाचनसत्र’ सकाळी आठ ते नऊ या वेळेत डॉ. शामाप्रसाद मुखर्जी उद्यान परिसरात होत असते. गेल्या रविवारी (ता.१) झालेल्या पंचेचाळीसाव्या ‘वाचनसत्रा’नंतर भुसावळ परिसरातील बालकुमार वाचकांना दिवाळी अंक व पुस्तकांचे वाटप करण्यात आले. या वाचनसत्राला एकूण ६३ वाचकांची उपस्थिती होती. किशोरावस्थेत समृद्ध वाचनाची गोडी लागावी, डिजिटल उपकरण, अवास्तव माहितीचा मारा व रिल्समध्ये गुंतलेल्या समाजमनाला वाचनाच्या माध्यमातून दिलासा व विसावा मिळवून देत एकाग्रता वाढावी, वाचनाच्या सवायितून अस्सल व खऱ्या ज्ञान मार्गाची ओळख होण्याच्या दृष्टिकोनातून हा उपक्रम हाती घेण्यात आला होता.
''शांतता... वाचत आहेत''
मागील पंचेचाळीस आठवड्यांपासून समाजातील सर्वस्तरांतून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. ''शांतता भुसावळकर वाचत आहेत'' या बोधवाक्याअंतर्गत राबविला जाणारा हा उपक्रम भुसवळ शहराची एक वेगळी सांस्कृतिक ओळख निर्माण करीत आहे. या उपक्रमात विविध वयोगटांतील वाचन व पुस्तकप्रेमी व्यक्ती आपले स्वतःचे पुस्तक बरोबर घेऊन सहभागी होऊ शकते.
दर रविवारी एक तास वाचन
वाचनाबरोबरीनेच आता हा उपक्रम विविध कलाकारांच्या कला प्रकारांना प्रोत्साहन देणारे व्यासपीठ म्हणून पुढे येत आहे. ‘शांतता भुसावळकर वाचत आहेत’ या बोधवाक्यानिशी सुरू करण्यात आलेल्या भुसावळ रिडर्स क्लबचे सदस्य दर रविवारी सकाळी आठ ते नऊ या वेळेत यावल रोडवरील डॉ. शामाप्रसाद मुखर्जी उद्यान परिसरात आपापल्या पुस्तकाचे सलग एक तास वाचन करतात. आपण आपले पुस्तक बरोबर आणून एक तास इतर पुस्तकप्रेमी समूहाबरोबर कुठल्याही व्यत्ययाविना वाचन करायचे, असे याचे स्वरूप आहे. वाचनसंस्कृतीला बळ देण्यासाठी, संस्कारशील व संवेदनशील व्यक्तिमत्व घडविण्यासाठी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन स्नेहयात्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष वीरेंद्र पाटील, संयोजक प्रा. गिरीश कुलकर्णी, संजय यावलकर, उज्वल सराफ यांनी केले आहे.