ॲंकर
BSW26B12190
भुसावळ : महिला उद्योजिका मेळाव्याचे उद् घाटन करताना वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे. सोबत प्रभारी नगराध्यक्षा शैलजा नारखेडे, डॉ. केतकी पाटील, रजनी सावकारे आदी.
----------------
उद्योजिका मेळाव्यातून महिलांची ‘दिवाळी गोड’
-------
मंत्री संजय सावकारे : भुसावळ येथे प्रतिष्ठा महिला मंडळाचा उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
भुसावळ, ता.१ : महिला उद्योजक मेळाव्याच्या माध्यमातून शहरासह ग्रामीण भागातील महिलांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध झाल्याने त्यांची दिवाळी गोड होईल, असे मत वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे यांनी व्यक्त केले. प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे आयोजित''महिला उद्योजिका मेळाव्याच्या उद् घाटनप्रसंगी ते बोलत होते.
दोनशेवर महिलांचा सहभाग
शहरातील प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे दरवर्षी महिला उद्योजक मेळाव्याचे ब्राह्मण संघात आयोजन केले जाते व यंदा उपक्रमाचे १४वे वर्ष होते. या मेळाव्याच्या माध्यमातून स्थानिक वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध होते. शिवाय महिलांच्या हाताला या काळात रोजगारही उपलब्ध होतो. विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आलेल्या जागेमुळे महिला उद्योजकांच्या दोन पैशांची बचत होऊन शहरासह परिसरातील नागरिक भेट देत असल्याने स्थानिक वस्तूंचे उत्तम प्रकारे मार्केटींगदेखील होते. मेळाव्यात शहरासह तालुक्यातील दोनशेपेक्षा जास्त महिलांनी आपले स्टॉल लावले आहेत.
स्वदेशी अपनाओचा नारा
मंत्री सावकारे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वदेशी अपनाओचा’ नारा दिला आहे. या माध्यमातून देशातील चलन देशातच राहण्यास मदत होणार आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून हा उद्देश सफल झाल्याचे सांगून त्यांनी प्रतिष्ठा महिला मंडळाच्या उपक्रमाचे यावेळी तोंड भरून कौतुक केले. सेवाभावी वृत्तीने राबविण्यात येणारा उद्योजक मेळाव्याचा उपक्रम स्तुत्य आहे. या माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध झाला असून, महिलांची दिवाळी गोड झाल्याचे ते म्हणाले.
उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध
प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे म्हणाल्या की, स्थानिक स्तरावरच महिलांच्या उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात आली आहे. शिवाय महिलांसाठी विनामूल्य स्टॉल लावून देण्यात आल्याने त्यांच्या दोन पैशांची बचत होऊन या माध्यमातून रोजगाराद्वारे त्यांची दिवाळी गोड होणार आहे. भुसावळ शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांनी स्थानिक स्तरावरच खरेदी करावी व मेळाव्याला अवश्य भेट द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी प्रभारी नगराध्यक्षा शैलजा नारखेडे, डॉ. केतकी पाटील उपस्थित होत्या.