भूषण लोंढेचा जामीन अर्ज नामंजूर
---
औरा बार गोळीबार प्रकरण : कारागृहातील मुक्काम कायम
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २२ : त्र्यंबक रोडवरील औरा बारमधील गोळीबार आणि मकोकाअंतर्गत अटक असलेला सराईत गुन्हेगार व पीएल ग्रुपचा भूषण प्रकाश लोंढे याचा जामीन अर्ज नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. आर. एन. पांढरे यांनी फेटाळून लावला आहे. यामुळे भूषण लोंढेची नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातून सुटका होण्याच्या मनसुब्यावर पाणी फिरले आहे.
औरा बारमध्ये ५ ऑक्टोबर २०२५ च्या मध्यरात्री गोळीबाराची घटना घडली होती. यात एक युवक गंभीर जखमी झाला होता. या प्रकरणी प्रकाश लोंढे, दीपक लोंढे, भूषण लोंढेसह पीएल टोळीविरोधात सातपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. १५ ऑक्टोबरला प्रकाश लोंढेला मुंबई उच्च न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला. त्यामुळे भूषण लोंढे यानेही सत्र न्यायालयाकडे जामिनासाठी धाव घेतली. यावर अतिरिक्त सत्र न्यायाधीश पांढरे यांच्यासमोर सरकार पक्ष व बचाव पक्षाचा युक्तिवाद झाला. त्यानंतर गुरुवारी (ता. २२) न्यायालयाने भूषण लोंढे याचा जामीन अर्ज फेटाळून लावला. भूषण याच्याविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून, तो जामिनावर बाहेर आल्यास साक्षीदारांवर दबाब आणण्याची शक्यता आहे. तसेच, सदरील गुन्ह्यातील त्याच्याविरोधात पुरावे निष्पन्न असल्याने त्याचा जामीन अर्ज नामंजूर करण्यात आला.