05421
पिंपळगाव मोर : भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त अभिवादन करताना उपस्थित मान्यवर.
राघोजी भांगरे यांच्या स्मृतींना अभिवादन
पिंपळगाव मोरला आदिवासी संस्कृतीचा जल्लोष
सकाळ वृत्तसेवा
घोटी, ता. १७ : राघोजी भांगरे यांच्या ऐतिहासिक वास्तव्यामुळे प्रसिद्ध असलेल्या बाडगीची माची येथे परिसराची स्वच्छता करून त्यांच्या स्मृतीस्थळी दीपप्रज्वलन व अभिवादन करण्यात आले. क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागातर्फे जनजाती गौरव सेवा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नाशिक यांच्या वतीने इगतपुरी तालुक्यातील बाडगीची माची व पिंपळगाव मोर येथे विविध कला, सांस्कृतिक व जनजागृतीपर उपक्रम घेण्यात आले.
या प्रसंगी पारंपरिक आदिवासी वेशभूषा, वाद्ये व सांस्कृतिक परंपरांचे दर्शन घडविणारी मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी दीपोत्सवही साजरा करण्यात आला. पिंपळगाव मोर येथे आदिवासी समाजाच्या पारंपरिक रूढी, परंपरा व सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडविणारे नृत्य, गायन, वादन व लोककलेचे कार्यक्रम झाले.
कार्यक्रमास आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त दिनकर पावरा, उपआयुक्त राजेंद्रकुमार हिवाळे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. गायक संदीप गवारी व कवयित्री कविता मडके यांनी सांस्कृतिक सादरीकरण केले. सोमनाथ कातडे यांनी राघोजी भांगरे यांच्या जीवनकार्याची माहिती दिली. यावेळी महिला व शेतकऱ्यांना विविध प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले, तर पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षभेट देण्यात आली. कार्यक्रमास नवनाथ खादे, सीताराम खोंडे, मनोज कराटे, मदन बेंडकोळी यांच्यासह मोठ्या संख्येने आदिवासी बांधव, महिला, युवक व ग्रामस्थ उपस्थित होते.