बिरसा मुंडा गौरव दिन सेवा सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रम
११ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत आरोग्यविषयक सक्षमीकरणावर भर
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. ७ : भगवान बिरसा मुंडा गौरव दिवस सेवा सप्ताहानिमित्त ११ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत नंदुरबार जिल्ह्यात विविध जनकल्याणकारी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यात आदिवासी बांधवांना शासकीय योजना व शासकीय सेवांचा लाभ सुलभ करणे. तसेच, शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक आणि आरोग्यविषयक सक्षमीकरणावर भर देण्यात येणार आहे.
११ नोव्हेंबरला सर्व जिल्हा मुख्यालयांमध्ये पत्रकार परिषदांचे आयोजन करण्यात येणार आहे. १२ नोव्हेंबरला अनुसूचित जमातीबहुल तालुक्यांच्या मुख्यालयांमध्ये पत्रकार परिषदांतून स्थानिक प्रश्न आणि शासकीय योजनांची माहिती देण्यात येईल. १३ नोव्हेंबरला पात्र लाभार्थ्यांना न्यूक्लियस बजेटअंतर्गत धनादेशांचे वितरण करण्यात येईल. धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान, प्रधानमंत्री जनमन योजना आणि अन्य शासकीय योजनांचे लाभ दिले जातील. महिला बचतगटांसह स्वयंरोजगार, व्यवसाय, कृषिपूरक उद्योग, सिंचन आणि उत्पादनवाढीसाठी मार्गदर्शन करण्यात येईल. १४ नोव्हेंबरला राज्यातील आदिवासी स्मारके आणि महापुरुषांच्या पुतळ्यांची स्वच्छता व देखभाल करण्यात येईल. सायंकाळी दीपोत्सवाचे आयोजन करून आदिवासी देव- देवता, पूजापद्धती, परंपरा आणि सांस्कृतिक अस्मितेचे दर्शन घडविण्यात येईल. याच दिवशी गडचिरोली येथे भगवान बिरसा मुंडा आदिवासी सेवक पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
१५ नोव्हेंबरला गडचिरोली येथे मुख्य शासकीय कार्यक्रम होईल. भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त १५ ला गडचिरोली येथे देशस्तरावरील मुख्य शासकीय कार्यक्रम होईल. या कार्यक्रमास राज्यपाल, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, आदिवासी विकास मंत्री, पालकमंत्री आदी उपस्थित राहतील. १६ नोव्हेंबरला आदिवासी बांधवांसाठी विशेष सेवा शिबिरांचे आयोजन केले जाईल. १७ नोव्हेंबरला विशेष आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येईल. १८ ला आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या उपक्रमांनी सेवा सप्ताहाचा समारोप होणार आहे.