NSK26H35141
नंदुरबार : जननायक बिरसा मुंडा यांना अभिवादनप्रसंगी उपस्थित अधिष्ठाता डॉ. संजय राठोड, डॉ. आनंद जामकर, डॉ. देवदत्त सूर्यवंशी.
---
वैद्यकीय महाविद्यालयात बिरसा मुंडा जयंती
जनजातीय गौरव दिनानिमित्त अभिवादन; हक्कांसाठीच्या संघर्षाला उजाळा
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. १६ : येथील जननायक बिरसा मुंडा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात महान स्वातंत्र्यसैनिक व आदिवासी समाजाचे जननायक बिरसा मुंडा यांची १५१ वी जयंती व जनजातीय गौरव दिन उत्साहात साजरी झाली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजय राठोड यांच्याहस्ते बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी प्राध्यापक तथा शरीररचनाशास्त्र विभागप्रमुख डॉ. आनंद जामकर, जनऔषध वैद्यकशास्त्र विभागप्रमुख डॉ. देवदत्त सूर्यवंशी यांच्यासह महाविद्यालयातील अधिकारी, प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.
याप्रसंगी वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्यांनी बिरसा मुंडा यांच्या जीवनकार्यावर, संघर्षावर आणि आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी त्यांनी दिलेल्या योगदानावर प्रकाश टाकला. ब्रिटिश राजवटीविरुद्ध त्यांनी पुकारलेला लढा, जल, जंगल आणि जमिनीच्या हक्कांसाठी उभारलेला ऐतिहासिक ‘उलगुलान’, तसेच आदिवासी समाजाच्या स्वाभिमानासाठी केलेल्या कार्याची माहिती उपस्थितांना देण्यात आली. ‘जय जोहार’ या अभिवादनाचे महत्त्व, तसेच बिरसा मुंडा यांना बहाल करण्यात आलेल्या ‘जननायक’ या उपाधीचा अर्थ या वेळी स्पष्ट करण्यात आला. अवघ्या २५ वर्षांच्या आयुष्यात बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाला संघटित करून अन्यायाविरुद्ध आणि हक्कांसाठी दिलेला लढा त्यांना खऱ्या अर्थाने जनतेचा नायक ठरवतो, असे वक्त्यांनी सांगितले.
रांची येथील तुरुंगात त्यांना आलेल्या हौतात्म्याचे स्मरण करून त्यांच्या सर्वोच्च बलिदानाला अभिवादन करण्यात आले. बिरसा मुंडा यांचे विचार, शौर्य आणि समाजाप्रति असलेली निष्ठा आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणादायी असल्याची भावना या वेळी व्यक्त करण्यात आली. तसेच त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासह समाजातील वंचित व उपेक्षित घटकांच्या सेवेसाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प उपस्थितांनी केला. प्रदर्शन वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता योगेंद्र राजपूत यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.