क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त कळवण प्रकल्पात १८ नोव्हेंबरपर्यंत जनजातीय गौरव सेवा सप्ताह

क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त कळवण प्रकल्पात १८ नोव्हेंबरपर्यंत जनजातीय गौरव सेवा सप्ताह
Published on: 
क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त कळवण प्रकल्पात जनजातीय गौरव सेवा सप्ताह सकाळ वृत्तसेवा कळवण ता.१३ : आदिवासी समाजाचे महानायक, क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंती अर्थात जनजातीय गौरव दिनानिमित्त कळवणच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पात १८ नोव्हेंबर २०२६ पर्यंत जनजातीय गौरव सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहाच्या माध्यमातून शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ आदिवासी बांधवांना मिळवून देतानाच त्यांच्या आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक विकासाला चालना देण्यात येणार आहे. अशी माहिती प्रकल्पाधिकारी डॉ. कश्मिरा संखे यांनी दिली. सप्ताहानिमित्त सहाय्यक प्रकल्पाधिकारी नितांत कांबळे, गटविकास अधिकारी रमेश वाघ, उपविभागीय कृषी अधिकारी अशोक डंबाळे यांची संयुक्त पत्रकार परिषद कळवण येथे झाली. शुक्रवारी (ता.१३) दिवंगत ए.टी.पवार सांस्कृतिक भवन येथे न्यूक्लिअस बजेट योजनेंतर्गत निवड झालेल्या पात्र लाभार्थ्यांना धनादेश वितरण करण्यात आले. तसेच धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान, प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान, महिला बचत गट आणि विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यात येणार आहे. कृषिपूरक व्यवसाय, शेतीसाठी आवश्यक साधने, सिंचन सुविधा, स्वयंरोजगार व आर्थिक स्वावलंबनासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शनिवारी (ता.१४) चणकापूर येथील हुतात्मा स्मारक, दळवट येथील लोकनेते ए टी पवार यांचे स्मारक तसेच प्रकल्पातील आदिवासी स्मारके आणि महापुरुषांच्या पुतळ्यांची स्वच्छता व देखभाल करण्यात येणार आहे. सायंकाळी दीपोत्सवाचे आयोजन करून आदिवासी देव-देवता, पूजापद्धती, परंपरा आणि सांस्कृतिक अस्मितेचे दर्शन घडविण्यात येईल. रविवारी (ता.१५) क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त मुख्य शासकीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. सोमवारी (ता.१६) आधारकार्ड व शासकीय कागदपत्र सेवा शिबिर आयोजित करून आधार कार्ड दुरुस्ती, अद्ययावतीकरण, वनपट्टेधारकांना लाभवाटप आणि विविध शासकीय योजनांसाठी आवश्यक कागदपत्रांबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. मंगळवारी (ता.१७) आरोग्य व पोषण जनजागृती शिबिर आणि सिकलसेल आजाराबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच स्थानिक पौष्टिक आहार, कडधान्ये आणि भरड धान्यांचे महत्त्व पटवून देण्यात येणार आहे. बुधवारी (ता.१८) आदिवासी आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक सक्षमीकरण दिन व सप्ताहाच्या समारोपानिमित्त महिला बचत गट, कौशल्य विकास, रोजगाराच्या संधी, शिष्यवृत्ती, व्यावसायिक शिक्षण, कृषी योजना आणि डिजिटल आर्थिक साक्षरतेबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.