पान तीन सेकंड मेन
-----------------
34913
नाशिक : पत्रकार परिषदेत बोलताना पालकमंत्री गिरीश महाजन. समवेत आदिवासी आयुक्त लीना बनसोड, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, सहाय्यक जिल्हाधिकारी अर्पिता ठुबे व कश्मिरा संख्ये.
‘ओझरखेड’जवळ भगवान बिरसा मुंडा यांचे स्मारक
पालकमंत्री गिरीश महाजन : जनजातीय सप्ताहनिमित्त विविध उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १२ : क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांची जयंती जनजातीय गौरव दिन म्हणून साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्त जिल्ह्यात जनजातीय गौरव सेवा सप्ताह साजरा करण्यात येत असून त्यामध्ये विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तसेच ओझरखेड धरणाजवळ पाच एकर क्षेत्रात भगवान बिरसा मुंडा यांचे स्मारक साकारण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री गिरीश महाजन यांनी बुधवारी (ता.११) दिली.
आदिवासी विकास आयुक्तालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री महाजन बोलत होते. यावेळी आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त लीना बनसोड, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, सहायक जिल्हाधिकारी अर्पिता ठुबे (नाशिक), डॉ. कश्मिरा संख्ये (कळवण), महापालिका स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, लक्ष्मण सावजी उपस्थित होते.
पालकमंत्री महाजन म्हणाले, क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा हे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक महान क्रांतिकारक होते. त्यांचे बलिदान संघर्ष, स्वाभिमान आणि सामाजिक परिवर्तनाचे कार्य आजही संपूर्ण देशाला प्रेरणा देणारे आहे. भगवान बिरसा मुंडा यांची यंदा १५१ वी जयंती आहे. यानिमित्त ओझरखेड धरणाजवळ भगवान बिरसा मुंडा यांचे स्मारक साकारण्यात येईल. या कामासाठी ४ कोटींच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. तेथे २१ फूट उंच पुतळ्यासह वृक्षारोपण केले जाईल, असे त्यांनी सांगितले.
विशेष सेवा सप्ताहात न्यूक्लियस बजेट योजनेंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यांना धनादेशांचे वितरण केले जाईल. स्मारकांची स्वच्छता व दीपोत्सव, आधारकार्ड व शासकीय कागदपत्रे सेवा शिबिर, आरोग्य व पोषण जनजागृतीपर शिबिर, आदिवासी आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक सक्षमीकरण दिवस साजरा होणार आहे.
---
शासकीय योजनांचा लाभ : महाजन
आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष सेवा सप्ताहाचे आयोजित केला आहे. या सप्ताहाच्या माध्यमातून शासकीय यंत्रणा थेट आदिवासी बांधवांच्या दारापर्यंत पोहचणार आहे. यावेळी पात्र लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ, आवश्यक कागदपत्रे, आरोग्य सुविधा, रोजगाराच्या संधी आणि आर्थिक सहाय्य उपलब्ध करुन दिले जाईल, अशी माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.