PML26B10253
पिंपळगाव बसवंत ः दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा धनादेश खासदार भास्कर भगरे, आमदार दिलीप बनकर, गोकूळ गिते, सत्यजित तांबे यांच्याकडे देताना भास्करराव बनकर.
--------------------
वाढदिवसाचा खर्च टाळत दुष्काळग्रस्तांना मदत
माजी सरपंच बनकर यांच्याकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस १ लाख ११ हजारांची मदत
सकाळ वृत्तसेवा
पिंपळगाव बसवंत, ता.१९ ः वाढदिवस म्हटला की जल्लोष, सत्कार आणि अनावश्यक खर्च होतो. याच खर्चाला फाटा देत समाजातील गरजू घटकांना मदतीचा हात देण्याचा आदर्श पिंपळगाव बसवंतचे माजी सरपंच भास्करराव बनकर यांनी घालून दिला आहे. दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस १ लाख ११ हजार रुपयांची मदत देऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे.
----------------
वाढदिवसानिमित्त होणारा अनावश्यक खर्च टाळून त्या पैशांचा उपयोग संकटग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी व्हावा, या उदात्त भावनेतून बनकर यांनी हा निर्णय घेतला. नैसर्गिक संकटांचा सामना करणाऱ्या दुष्काळग्रस्तांना मदतीची गरज असताना समाजातील प्रत्येक घटकाने आपापल्या परीने योगदान द्यावे, हा संदेशही त्यांच्या या कृतीतून दिला जात आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी हा धनादेश खासदार भास्कर भगरे, आमदार दिलीप बनकर, गोकूळ गिते यांच्याकडे सुपूर्द केला.
सध्याच्या काळात वाढदिवस विविध प्रकारे साजरे करण्याकडे कल वाढत असताना, सामाजिक जाणीव जपत गरजूंसाठी मदत देण्याचा त्यांचा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे. वैयक्तिक आनंदासोबतच समाजातील दुःख आणि संकटांची जाणीव ठेवून केलेली ही मदत सामाजिक उत्तरदायित्वाचे उत्तम उदाहरण आहे.
भास्करराव बनकर यांच्या या दातृत्वाचे परिसरातून कौतुक होत आहे. त्यांच्या उपक्रमामुळे इतरांनाही सामाजिक कार्यासाठी पुढाकार घेण्याची प्रेरणा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. वाढदिवसाचा आनंद समाजहितासाठी खर्च करून बनकर यांनी माणुसकी आणि सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण केला आहे.
निफाड पंचायत समितीच्या माजी सभापती वैशाली बनकर, पिंपळगाव विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्षा शोभाताई बनकर, उपाध्यक्ष सोमनाथ मोरे, संचालक चंद्रकांत बनकर, हिराबाई खोडे, दिलीप मोरे, रामराव डेरे, सुरेश खोडे, अनिल बनकर, विनायक खोडे, विजय देशमाने, आशिष बागूल, दत्तात्रेय देवकर, अशोक भवर, मोतिराम पवार, विश्वास बनकर, हर्षल जाधव, सचिव नितीन कर्डेल आदी उपस्थित होते.
----