वर जाहिराती शेजारी
------------------
लोगो : स्वीकृत नगरसेवक नियुक्ती
-------------------
स्वीकृत सदस्यांचा ‘फॉर्म्युला’ ऐनवेळी बदलला
आमदारांचे बळ घटवून ‘मध्य’वर विशेष फोकस
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ४ : भाजपमध्ये सहा स्वीकृत सदस्यांची नियुक्ती करताना तीन विधानसभा मतदारसंघातून आमदारांच्या पसंतीने प्रत्येकी दोन स्वीकृत नावे देण्याचा फॉर्म्युला ऐनवेळी बदलतं दोनऐवजी प्रत्येकी एक व संघटनेतील तिघांच्या नावावर भाजपने शिक्कामोर्तब केल्याने आमदारांचे बळ कमी करण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून येत आहे. तर सर्वात कमी नगरसेवक निवडून आलेल्या ‘मध्य'' विधानसभा मतदारसंघातून तब्बल चौघांना संधी देत येथे मतदारसंघ भक्कम करण्याचा प्रयत्न झाला आहे.
महापालिकेत सत्ताधारी भाजपला सहा स्वीकृत नगरसेवकांचा कोटा होता. स्वीकृत सदस्य नियुक्ती करताना भाजपला मोठी कसरत करावी लागली. प्रथम पुर्व, मध्य, पश्चिम विधानसभा मतदारसंघातून प्रत्येकी दोन सदस्यांचे नियोजन होते; परंतु ऐनवेळी फॉर्म्युला बदलण्यात आला. पूर्वमध्ये शहराध्यक्ष सुनील केदार, प्रवीण भाटे, शांताराम घंटे, सुहास शुक्ल यांची नावे आघाडीवर होती. परंतु यातील एकही नाव न घेता पुरोहित संघाचे चंद्रशेखर पंचाक्षरी यांना संधी देण्यात आली. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांना संधी देण्यात आल्याचे बोलले जात आहे. पश्चिमेमधून अमोल पाटील यांच्या नावासाठी आमदार डॉ. राहुल आहेर यांचा आग्रह होता; परंतु अंतर्गत विरोधातून त्यांचे नाव मागे पडले. प्रवीण पाटील, डॉ. वैभव महाले, सोनाली ठाकरे, राकेश ढोमसे यांच्या नावाची चर्चा होती. परंतु त्यांनादेखील थांबा देत आमदार सीमा हिरे यांच्या यादीतील सातपूरमधून संभेराव यांचे नाव घोषित करण्यात आले. संभेराव अनेक वर्षांपासून सातपूर भागात पक्षाची धुरा सांभाळतं आहे. मध्यमधून निखिल पवार, चित्रेश वस्पटे यांची नावे आघाडीवर होती; परंतु आमदार फरांदे यांच्या एकूण नावांपैकी माजी नगरसेवक संदीप लेनकर यांना संधी देण्यात आली. लेनकर यांनी अडचणीच्या काळात मुंबई नाका भागात आमदार फरांदे यांच्या प्रचारासाठी केलेल्या प्रयत्नांची बक्षिसी त्यांना देण्यात आल्याचे बोलले जात आहे.
---------चौकट
संघटनेला बळ
अजित चव्हाण भाजपचे प्रवक्ते आहेत. रोहिणी नायडू, लेनकर तसेच सहकार क्षेत्रातील नावाजलेले हेमंत धात्रक चौघेही मध्य विधानसभा मतदारसंघातील आहे. मध्य विधानसभा मतदारसंघ भक्कम करण्याच्या अनुषंगाने चौघांना संधी देण्यात आल्याचे बोलले जात आहे. संभेराव, नायडू, पंचाक्षरी तसेच धात्रक यांच्या नियुक्ती मागे पक्ष संघटनेला बळकटी देण्याचा भाग मानला जात आहे.
--------------चौकट
वरिष्ठांचे कनेक्शन
स्वीकृत सदस्य नियुक्तीसाठी पक्षीय पातळीवर विचार केल्याचे वरकरणी दिसतं असले तरी प्रत्यक्षात सर्वच पक्षांमध्ये राज्य पातळीवरील वरिष्ठ नेत्यांकडे असलेले वजन वापरण्यात आल्याचे दिसून येत आहे. ‘उबाठा’ मध्ये सहसंपर्क नेते दत्ता गायकवाड यांचे चिरंजीव हेमंतकुमार यांना संधी देवून पक्षनिष्ठेची पावती देण्यात आली आहे. बाबासाहेब गायकवाड यांचे उबाठा प्रवक्ते खा. संजय राऊत यांच्याशी असलेली जवळीक महत्त्वाची मानली जात आहे. भाजपमध्ये धात्रक यांच्या नावासाठी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची शिफारस असल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेत बाबूराव आढाव यांचे नाव समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट यांच्याकडून आल्याचे समजते.
--------------------