जिल्हाध्यक्ष प्रा. निलेश कचवे
-----
मेन
विरोधकांकडून दुष्काळाचे राजकारण
भाजप शेतकऱ्यांच्या पाठीशी : कचवे
सकाळ वृत्तसेवा
मालेगाव, ता. १८ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने विविध दुष्काळी उपाययाजेना करत शेतकऱ्यांसह सर्व घटकांना दिलासा दिला आहे. राज्यातील ३०५ तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आले असून शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी पाच हजार रुपयांचे अग्रिम अर्थसहाय्य जमा होणार आहे. असे असताना विरोधकांकडून दुष्काळाचे राजकारण दुर्दैवी आहे अशी टीका भाजपचे मालेगाव जिल्हाध्यक्ष प्रा. निलेश कचवे यांनी केली आहे.
ते म्हणाले की, दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांकडे कर्जवसुलीकरिता तगादा लावणाऱ्या यंत्रणांना मुख्यमंत्र्यांनी तंबी दिली आहे. पिण्याचे पाणी व पुरेशा चारा उपलब्धतेसाठी ठोस उपाययोजना आखल्या आहेत. दुष्काळी तालुक्यांतील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात आले आहे. जनावरांना पुरेसा चारा उपलब्ध व्हावा याकरिता चारा देणाऱ्या पिकांचे नियोजन करण्यात येणार आहे. राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर विरोधकांकडून केले जाणारे राजकारण दुर्दैवी आहे अशी खंत श्री. कचवे यांनी व्यक्त केली आहे.
साडेसात अश्वशक्तीपर्यंतच्या कृषी पंपांचा वीजपुरवठा मोफत आहे. कर्जवसुलीच्या तगाद्यातून शेतकऱ्यास दिलासा मिळाला आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. राज्यातील दोन लाखांहून अधिक अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दोन हजार रुपयांची भाऊबीज देण्यात येणार आहे.
फडणवीस सरकारने जाहीर केलेली मदत कर्नाटक सरकारपेक्षा दुप्पट आहे. अनेक योजनांद्वारे शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असलेल्या फडणवीस सरकारने दुष्काळाला तोंड देण्याची सज्जता केली आहे. सर्वांनी त्याला साथ द्यावी, विरोधकांनी राजकारण न करता जनतेच्या हिताचा विचार करावा. दुष्काळाच्या समस्येतून कायमची मुक्ती देण्याच्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्या संकल्पास साथ द्यावी असे आवाहनही श्री. कचवे यांनी केले आहे.