आवश्यक
----
बिरसा मुंडा जयंतीनिमित्त
भाजपचा जनजाती गौरव सप्ताह
भाजपकडून १८ नोव्हेंबरपर्यंत विविध उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १२ : भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त भाजपच्या वतीने जिल्ह्यात ११ ते १८ नोव्हेंबरदरम्यान जनजाती गौरव सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. आदिवासी समाजाचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान, महापुरुषांचा इतिहास, संस्कृती आणि परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासह शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. याबाबत आमदार सुरेश भोळे आणि भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष देवराम होळी आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात १३ नोव्हेंबरला जनजागृती कार्यक्रम आणि आदिवासी महापुरुषांच्या स्मारकांजवळ दीपोत्सव, १४ ला महापुरुषांच्या पुतळ्यांची स्वच्छता, १५ ला प्रतिमापूजन, माल्यार्पण, जीवनचरित्रावर व्याख्यान, १६ ला शोभायात्रा, सामाजिक-सांस्कृतिक कार्यक्रम आणि आदिवासी समाजातील पुरस्कारप्राप्त व्यक्तींचा सन्मान होईल. १७ ला शाळांमध्ये भव्य मिरवणुका, लोकनृत्य, लोकगीते, साहित्य चर्चा, विविध स्पर्धा, प्रदर्शने आणि क्रीडा उपक्रम तर १८ ला आदिवासी समाजासाठीच्या शासकीय योजनांची माहिती, महिला बचत गटांसाठी जनजागृती आणि आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेवेळी पूर्व जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, महानगराध्यक्ष्ष दीपक सूर्यवंशी, सुभाष पवार, दीपक कोळी आदी उपस्थित होते.