बोगस दिव्यांगत्व प्रकरणी
अखेर कारवाईचे आश्वासन
प्रशासनाकडून पत्र; शिक्षकांचे उपोषण मागे
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १७ : जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतर्गत दिव्यांग कर्मचारी कार्यरत असून अनेक कर्मचाऱ्यांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र काढून शासनाचे विविध लाभ घेतला आहे. अशा बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर कारवाई संदर्भात केलेल्या मागणीवर जिल्हा परिषद प्रशासनाकडून कारवाई करण्यासंदर्भात आश्वासन दिल्यानंतर आज (ता.१७) सायंकाळी दिव्यांग शिक्षकांनी उपोषण मागे घेतले आहे.
बोगस दिव्यांग प्रकरणात कारवाईबाबत जिल्हा परिषद प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्याने दिव्यांग शिक्षक रवींद्र सोनवणे व पांडुरंग चौधरी यांनी सोमवारपासून (ता.१६) जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषणाला सुरवात केली होती. आजच्या दुसऱ्या दिवशी देखील शिक्षकांनी उपोषण सुरूच ठेवले होते. मात्र दुपारी सामान्य प्रशासन विभागातील अधिकारी व प्राथमिक शिक्षणाधिकारी नीलेश पाटील यांनी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणकर्ते शिक्षकांच्या मागण्यांबाबत चर्चा केली.
उपोषण मागे
दरम्यान, जिल्हा परिषद प्रशासनाकडून बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची प्रमुख मागणी शिक्षकांची होती. त्यानुसार न्यायालयाच्या आदेशानुसार बोगस दिव्यांग आढळून आलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाकडून आश्वासन देण्यात आले.
चौकट
...अन्यथा पुन्हा आंदोलन
कारवाईबाबतचे पत्र देखील उपोषणकर्त्या शिक्षकांना दिले. यानंतर रवींद्र सोनवणे व पांडुरंग चौधरी यांनी उपोषण मागे घेतले. दरम्यान दहा दिवसात प्रशासनाकडून कारवाई झाली नाही. तर पुन्हा उपोषणास बसण्याचा इशारा शिक्षकांनी दिला.