Bogus Medical Certificate : रेकॉर्डअभावी चौकशी समितीचे काम रेंगाळले | Latest Marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Fake Medical Certificate case

Bogus Medical Certificate : रेकॉर्डअभावी चौकशी समितीचे काम रेंगाळले

नाशिक : पोलिस कर्मचाऱ्यांच्या आजारपणाच्या बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र प्रकरणी चौकशी समिती नेमण्यात आलेली आहे. या चौकशी समितीला जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय प्रमाणपत्रांसंदर्भातील रेकॉर्ड विभागाकडून संबंधित रेकॉर्ड उपलब्ध करून देण्यात आलेले नाही. याच रेकॉर्ड कक्षाचा लिपिकावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यामुळे सदरील रेकॉर्ड मिळण्यासाठी समितीने नोटीस बजावली आहे.

रेकॉर्ड न मिळाल्याने नेमण्यात आलेल्या चौकशी समितीचे काम मात्र यामुळे रेंगाळले आहे. दरम्यान, अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतलेल्या डॉ. श्रीवास व डॉ. निखिल सैंदाणे यांच्या अर्जावर मंगळवारी (ता. २०) सुनावणी होणार आहे. (Bogus Medical Certificate Case Work of inquiry committee delayed due to lack of records Nashik Latest Marathi News)

नाशिक ग्रामीण पोलिस दलातील पोलिस कर्मचाऱ्यांनी आंतरजिल्हा बदल्या वा आजारपणाच्या रजेसाठी जिल्हा अधीक्षक कार्यालयाकडे बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. यात आत्तापर्यंत ग्रामीण पोलिस मुख्यालयातील वरिष्ठ लिपिकासह जिल्हा रुग्णालयातील दोन कर्मचारी व दोन खासगी डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बोगस वैद्यकीय प्रमाणपत्रांमुळे आरोग्य विभागाने चौकशी समिती नेमली आहे. या चौकशी समितीकडून बोगस वैद्यकीय प्रमाणपत्रांसंदर्भात रेकॉर्डची तपासणी केली जाणार आहे. त्यासाठी डॉ. उत्कर्ष दुधेडिया व डॉ. गणेश चेवले यांच्या चौकशी समितीने जिल्हा रुग्णालयाच्या रेकॉर्ड विभागाकडे संबंधित रेकॉर्ड मागितले आहे. परंतु, या प्रकरणात रेकॉर्ड कक्षाचे लिपिक किशोर पगारे यांच्याविरोधातही गुन्हा दाखल असल्याने ग्रामीण पोलिसांकडून पगारे यांना कधीही अटक होऊ शकते.

त्यातच, रेकॉर्ड कक्षातील संबंधित फाइल्स वा रेकॉर्ड अद्याप चौकशी समितीला उपलब्ध होऊ शकलेले नाही. या रेकॉर्डसाठी समितीने नोटीस बजावलेली आहे. त्यामुळे रेकॉर्ड उपलब्ध झाल्यानंतरच या प्रकरणाची सखोल माहिती मिळू शकेल. सध्या मात्र रेकॉर्डअभावी चौकशी समितीचे काम रखडलेले आहे. दुसरीकडे पोलिसांकडूनही याप्रकरणी सुरू असलेला तपास थंडावल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा: बांधकाम, पाणीपुरवठा, मलनिस्सारण कामांना कात्री; दायित्वाचा भार कमी होणार

अटकपूर्ववर आज सुनावणी

बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र प्रकरणी दुसऱ्यांदा जबाबासाठी नोटीस बजावल्यानंतरही पोलिसांसमोर हजर न झालेले जिल्हा रुग्णालयाचे तत्कालीन अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीवास व डॉ. निखिल सैंदाणे यांनी जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला आहे.

या अटकपूर्व जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी होणार आहे. या प्रामुख्याने पोलिसांकडून दाखल केलेल्या गुन्ह्यांतील त्रुटी व बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल न करणे आदी स्वरूपाच्या बाबींचा फायदा अटकपूर्व जामीन मिळण्यास होऊ शकेल, अशी चर्चा आहे.

"रेकॉर्ड कक्षाचे लिपिक काही कारणास्तव सुटीवर आहेत. त्यांना रेकॉर्डबाबत नोटीस बजावण्यात आली आहे. ते उपलब्ध झाल्यानंतर चौकशी समितीतून काही बाबी स्पष्ट होतील."

-डॉ. उत्कर्ष दुधेडिया, प्रमुख, चौकशी समिती तथा अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय

हेही वाचा: ढगफुटी सदृश्य पावसाचा तडाखा; उजनीत 12 हजार कोंबड्यांचा तडफडून मृत्यू

Web Title: Bogus Medical Certificate Case Work Of Inquiry Committee Delayed Due To Lack Of Records Nashik Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..