गुन्हेशाखेत ‘शालार्थ’चे कागदपत्र्यांचे गठ्ठेच गठ्ठे

गुन्हेशाखेत ‘शालार्थ’चे कागदपत्र्यांचे गठ्ठेच गठ्ठे
Published on: 
बोगस शालार्थ आयडींचे ‘गठ्ठे’ उघडणार घोटाळ्याचे गुपित १२०० संशयित रडारवर; नाशिक गुन्हेशाखेकडून हजारो कागदपत्रांची छाननी सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता.६ : राज्यभर गाजत असलेल्या सुमारे १६० कोटी रुपयांच्या शालार्थ आयडी घोटाळ्यात उत्तर महाराष्ट्रातील बोगस नियुक्त्यांची कागदपत्रे नाशिक शहर गुन्हेशाखेच्या तपासाच्या केंद्रस्थानी आली आहेत. संशयित शिक्षकांची सेवापुस्तके, नियुक्ती आदेशांसह अन्य कागदपत्रांचे गठ्ठे गुन्हेशाखेत जमा झाले असून, तपास पथकाकडून प्रत्येक दस्तऐवजाची बारकाईने पडताळणी सुरू आहे. या कागदपत्रांच्या आधारे बोगस नियुक्त्यांची साखळी उलगडण्याबरोबरच संशयितांविरोधात पुरावे संकलित केले जात आहेत. नाशिक रोड पोलिस ठाण्यात शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी पहिला गुन्हा २०२५ मध्ये, तर दुसरा गुन्हा २०२६ मध्ये दाखल झाला. या दोन्ही गुन्ह्यांचा तपास स्वतंत्र विशेष पथकांकडून सहायक पोलिस आयुक्त डॉ. सचिन बारी आणि सहायक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. २०२२ ते २०२४ या कालावधीत विविध शैक्षणिक संस्थांमध्ये झालेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचे तपासात समोर आले आहे. तपासात तब्बल ८४१ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे बनावट शालार्थ आयडी तयार करून शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात सुमारे १२०० संशयितांची ओळख पटली आहे. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी तपासासाठी दोन सहायक पोलिस आयुक्तांची नियुक्ती केल्याने तपासाला वेग आला आहे. उत्तर महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यातील शिक्षण संस्थांनी सर्वाधिक बोगस शालार्थ आयडींच्या माध्यमातून आर्थिक लाभ घेतल्याचे तपासातून समोर आले आहे. जळगाव, धुळे आणि नाशिक जिल्ह्यांत प्रत्येकी दोन, तर नंदुरबारमध्ये एका विशेष पथकाने तळ ठोकला आहे. संशयित शाळा, शैक्षणिक संस्था आणि शिक्षण विभागाच्या कार्यालयांवर छापे टाकून कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. लाभार्थी शिक्षकांचीही चौकशी करण्यात येत आहे. हजारो कागदपत्रांचा तपास तपासादरम्यान हजारो कागदपत्रे व दस्तऐवज जप्त करण्यात आले आहेत. सेवापुस्तके, नियुक्ती आदेश आणि अन्य कागदपत्रांचे गठ्ठे शहर गुन्हेशाखेत जमा झाले आहेत. या दस्तऐवजांची छाननी करून बोगस नियुक्त्यांमागील व्यक्ती आणि संस्थांची भूमिका निश्चित करण्याचे काम सुरू आहे. त्याचबरोबर न्यायालयीन लढाईसाठी आवश्यक पुरावे तयार करण्याची प्रक्रियाही सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com