कापड पेठ बालाजी भगवान
फोटो : H32942
---
बालाजी ब्रह्मोत्सवाचा भक्तिरंग
नाशकातील कापड पेठ येथील श्री व्यंकटेश बालाजी संस्थान हे एक अतिशय प्राचीन, ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळ आहे. या मंदिराला आणि संस्थानला ३५० वर्षांपेक्षा जास्त जुनी गौरवशाली परंपरा आहे येथे दरवर्षी ब्रह्मोत्सव अतिशय उत्साहात साजरा केला जातो (विमानोत्सव सोहळा) तिरुपतीप्रमाणेच विविध वाहन उत्सव आणि धार्मिक कार्यक्रम येथे आयोजित केले जातात. यंदाही हे उत्सव पार पडले.
- प्रशांत भरवीरकर
कापड पेठेतील श्री व्यंकटेश बालाजी संस्थान ट्रस्टतर्फे श्री बालाजी मंदिरात आयोजित ब्रह्मोत्सव अर्थात नवरात्रोत्सव भक्तिमय आणि चैतन्यमय वातावरणात साजरा होत आहे. २५ ऑक्टोबरपर्यंत सुरू असलेल्या या उत्सवात विविध धार्मिक विधी, पूजाविधी, मंदिर परिक्रमा आणि श्रींच्या विविध वाहनांवरील स्वारीने भाविकांना भक्तिरसाची अनुभूती दिली. मंदिर परिसरात दररोज भाविकांची मोठी गर्दी होत असून, जयघोष आणि मंत्रोच्चारांनी परिसर दुमदुमून जात आहे.
आश्विन शुक्ल प्रतिपदेपासून सुरू झालेल्या ब्रह्मोत्सवाची घटस्थापना, ध्वजपूजन, ध्वजारोहण, पुण्यवाचन आणि पवमानाभिषेक अशा धार्मिक विधींनी सुरुवात झाली. सुदर्शन दिग्विजय रथाच्या नगरपरिक्रमेमुळे उत्सवाच्या चैतन्यात भर पडली.
उत्सवाच्या काळात सकाळी श्रींची मंदिर परिक्रमा, विविध अभिषेक, विशेष पूजा आणि आरतीसाठी भाविकांची गर्दी होत आहे. सिंह, चंद्र, सूर्य, अश्व, गज, शेष, गरुड, मारुती, मयूर आणि रथ अशा विविध वाहनांवरील श्रींच्या स्वारीचे दर्शन घेण्यासाठी भाविक उत्सुकतेने उपस्थित राहत आहेत. १७ ऑक्टोबरला सप्तमीच्या शुभमुहूर्तावर श्रींचा कल्याणोत्सव भक्तिभावाने संपन्न झाला. या मंगलमय सोहळ्याने उपस्थित भाविकांना आध्यात्मिक आनंदाची अनुभूती दिली. १८ ऑक्टोबरला अष्टमीच्या निमित्ताने १०८ कलशाभिषेक आणि कुमारिका पूजन करण्यात आले. आगामी दिवसांत विजयादशमीचा धार्मिक सोहळा, अवभृत स्नान, भंडारा आणि भोजनप्रसाद तसेच कोजागरी पौर्णिमेनिमित्त व्यंकटेश्वर होम, रासोत्सव आणि आरती असे विविध कार्यक्रम होणार आहेत. परंपरा, श्रद्धा आणि भक्ती यांचा सुंदर संगम असलेल्या या ब्रह्मोत्सवामुळे मंदिर परिसरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत श्री व्यंकटेशाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची पावले मंदिराकडे वळत असून, भक्तिमय वातावरणात ब्रह्मोत्सव साजरा होत आहे.