सहायक वीज अभियंत्यासह
पथकाला लाच घेताना अटक
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १५ : वीजचोरी होत असल्याची भीती घालून व गुन्हा दाखल करण्याची धमकी देत ४० हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना ‘महावितरण’च्या सहायक अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मुद्देमालासह पकडले. गुन्ह्यात सहभागी दोन वरिष्ठ तंत्रज्ञांनाही अटक झाली असून, रविवारी (ता. १५) न्यायालयाने तिघांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.
राज्य वीज महावितकरण कंपनीत कार्यरत सहायक अभियंता विशाल वसंत नेमाडे (वय ३७, वर्ग- २, रा. योगेश्वरनगर, जळगाव), तंत्रज्ञ भरत कडू तायडे (वय ४५, रा. लक्ष्मीनगर) व वरिष्ठ तंत्रज्ञ रवींद्र छन्नू पाटील (वय ४१, रा. झुरखेडा, ता. धरणगाव, जि. जळगाव) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. तक्रारदाराकडे वरील तिघांनी शनिवारी (ता. १४) सकाळी अकराला छापा टाकला व नवीन वीजमीटरची तपासणी केली. मीटर व घरातील विद्युत उपकरणांचे फोटोही काढले. त्यानंतर भरत तायडे याने तक्रारदाराला फोन करून पांडे चौकात बोलावून घेतले. तेथे तिघांनी घरातील विद्युत उपकरणांचा लोड जास्त असल्याचे व सर्व्हिस वायर बायपास करून वीजचोरी होत असल्याचे सांगितले. या प्रकरणी वीज चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी व पुढील कारवाई टाळण्यासाठी तक्रारदाराकडे ४० हजार रुपयांची लाच मागितली. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. तक्रारीची दखल घेत पंचासमक्ष सापळा रचून तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने त्या तिघांना रविवारी (ता. १५) न्यायालयात हजर केले. न्यायालयाने एक दिवसाच्या पोलिस कोठडीत तिघांना रवाना केले.