बीएसएनएल कार्यालयात
संगणक, साहित्याची जप्ती
कोर्टाच्या आदेशानुसार वेतन फरकप्रश्नी कारवाई
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ४ः त्रयस्थ कंत्राटदारामार्फत पुरविलेल्या सुरक्षारक्षकांच्या वेतनाच्या फरकापोटीची रक्कम थकविल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने बीएसएनएल क्षेत्रीय कार्यालयात जप्तीची कारवाई केली आहे. बुधवारी (ता.३) मायको सर्कलजवळील कार्यालयात केलेल्या या कारवाईत संगणक, सीपीयुसह इतर साहित्य जप्त करुन नेले आहे.
प्राप्त माहितीनुसार, बीएसएनएलच्या क्षेत्रीय कार्यालयात सुरक्षारक्षक उपलब्ध करण्यासंदर्भात त्रयस्थ कंत्राटदार नेमले होते. त्यांच्यामार्फत सुमारे शंभराहून अधिक सुरक्षारक्षक नेमण्यात आले होते. यापैकी बहुतांश सुरक्षारक्षक हे माजी सैनिक होते. २०१९ मध्ये वेतनात सुधारणा करण्याचा निर्णय जाहीर झाला होता. यादरम्यान संबंधित कंत्राटदाराला बीएसएनएलने निविदेत नमूद वेतन रक्कम अदा केली होते. परंतु २०१९ च्या निर्णयाचा संदर्भ घेताना, वेतन फरकाची रक्कम बीएसएनएलने अदा करावी, अशी मागणी संबंधितांनी केली होती. वेतन फरकाची रक्कम सुमारे १ कोटी ६० लाख रुपये असताना, व्याजाची रक्कम मिळून सुमारे २ कोटी २१ लाख रुपये थकीत असल्याचा दावा संबंधित कंत्राटदाराने केला. फरक रक्कम मिळविण्यासाठी लवादाचा निर्णय व पुढे न्यायालयाचा निर्णय कंत्राटदाराकडून लागला. उच्च न्यायालयात दाद मागण्याच्या तयारीत बीएसएनएल असताना, संबंधितांनी जप्तीच्या कारवाईसंदर्भात मान्यता मिळविली. न्यायालय आदेशानुसार बुधवारी कार्यालयातील साहित्याची जप्ती करण्यात आली.
----
इन्फोः
संवेदनशील माहिती धोक्यात...
या वादामुळे जप्त संगणकाच्या सीपीयूमध्ये असलेली संवेदनशील माहिती धोक्यात आली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार बीएसएनएलकडून फरक रक्कम अदा करण्याची तयारी, व व्याजमाफीचे प्रयत्न सुरु असताना या कारवाईमुळे अधिकारी वर्गाची तारांबळ उडाली. न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करण्याचा कुठलाही उद्देश नसून, निर्धारित मुदतीनुसार नोव्हेंबरमध्ये दिलेल्या सुनावणीच्या तारखेपर्यंत रकमेची तजवीज करण्याची प्रक्रिया सुरु होती, असे बीएसएनएलमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
---