जळगाव: जामोद (जि. बुलढाणा) पोलिस ठाण्याला एक निनावी पत्र आले. पत्रातील आरोप गंभीर स्वरूपाचे होते. पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी पोलिस ठाण्यातील तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक सचिन वाकडे यांच्याकडे तपास दिला. पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नेमके गाव शोधून पत्रात उल्लेख असलेल्या गतिमंद व मुलीचाही शोध घेतला; परंतु तिच्या कुटुंबीयांनी पत्रातील आरोप फेटाळून लावले. मात्र, आरोपात तथ्य असतानाही कोणीही बोलायला तयार नव्हते. अखेर उपनिरीक्षक वाकडे यांनी स्वत: फिर्यादी होत गुन्हा नोंद केला आणि फक्त निनावी पत्राच्या आधारे तपास करीत संशयितांना जेरबंद केले.