Diwali Festival 2022 : ज्वेलरीची चमक अन्‌ मिठाईचा गोडवा | Latest Marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Festival Season shopping

Diwali Festival 2022 : ज्वेलरीची चमक अन्‌ मिठाईचा गोडवा

नाशिक : दीपावली म्हणजे दागदागिने परिधान करण्याचा अन्‌‌ गोडधोड मिठाईची चव चाखण्याचा सण. या दीपावलीच्या शुभमुहूर्तावर सोन्याची दागिन्यांची खरेदी केली जाते. भेट म्हणून पाडव्याला पतीकडून पत्नीला वा भाऊबीजेला भावाकडून बहिणीला सोन्याची भेट वस्तू दिली जाते. दिवाळी म्हणजे गोडगोड पदार्थांची रेलचेल. यामुळे शहरातील मिठाई दुकानांमध्ये खरेदीसाठी ग्राहकांची रीघ लागली होती. (bumper selling of sweets gold jewellery on diwali festival eve nashik news)

दीपावलीमध्ये धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन आणि दीपावली पाडव्याला सोने-चांदी खरेदी करण्याची प्रथा आहे. त्यामुळे सोमवारी (ता. २४) लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर महिलांची सोन्या-चांदीच्या दुकानांमध्ये गर्दी दिसून आली. प्रामुख्याने मंगळसूत्रांच्या नवनवीन व्हरायटीला मागणी दिसून आली. पारंपरिक दागिन्यांकडे असलेला कलही काही महिलांचा असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. या मुहूर्तावर अनेक ग्राहकांकडून चांदीच्या देवतांची मूर्ती करवून घेतली जाते.

विशेषत: चांदीची लक्ष्मीदेवीची व आराध्य दैवत गणपतीची मूर्ती करण्याकडे कल दिसून आला. दोन वर्षांत सराफी पेढ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले होते. यंदा दिवाळीतील तेजीचा चांगला परिणाम सराफी पेढ्यांवर दिसून आला. येत्या दोन दिवस ही तेजी कायम राहील, तर त्यानंतरही सराफी व्यवसायामध्ये आर्थिक उलाढाल होत राहणार आहे.

हेही वाचा: Diwali Ration Scheme : स्वस्त धान्य दुकानातून आनंदाचा शिधा वाटप

मिठाई दुकानांमध्ये ग्राहकांची रीघ

दिवाळीनिमित्त एकमेकांना शुभेच्छा देताना मिठाई भेट दिली जाते. त्यामुळे मिठाई विक्रेत्यांकडे विविध आकारातील मिठाई बॉक्स होती. १५० रुपयांपासून ते दोन-तीन हजार रुपयांपर्यंत मिठाईचे बॉक्स होते. सुकामेवा भेट म्हणून देण्यासाठीचेही बॉक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. २५० ते दीड-दोन हजार रुपयांपर्यंतचे हे बॉक्स मिठाई विक्रेत्यांकडे ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत.

आकर्षक मांडणी आणि दर्जेदार मिठाई व सुकामेव्यामुळे याकडे ग्राहक आकर्षिले जात आहेत. लक्ष्मीपूजनाला सायंकाळी बहुतांशी दुकानांमध्ये मिठाई संपली होती. भेटवस्तू स्वरुपात देण्यासाठीचे मिठाई बॉक्सला प्रचंड मागणी होती. दिवाळी फराळालाही ग्राहकांची मागणी असल्याचे दिसून आले. चकली, लाडू, करंजी, शेव-चिवडा खरेदीकडे ग्राहकांचा कल होता.

"दोन वर्षे कोरोनामुळे दिवाळी सण साजरा होऊ शकला नाही. यंदा कोरोना नसल्याने ग्राहकांमध्ये उत्साह आहे. मिठाई भेट देण्यासाठी विविध आकारातील बॉक्सला मागणी आहे. सुका मेव्यालाही ग्राहकांची पसंती आहे. मिठाई हातोहात संपत आहे."
-रतन चौधरी, सागर स्वीटस्‌, गंगापूर रोड

हेही वाचा: Nashik : खरिपाने झोपवले; पण रब्बीची चांगली पायाभरणी!