Nashik : शहरातील स्वच्छतेसाठी सहा यांत्रिकी झाडू खरेदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nashik

शहरातील स्वच्छतेसाठी सहा यांत्रिकी झाडू खरेदी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शहरातील अंतर्गत रस्ते व रिंगरोडची स्वच्छता करण्यासाठी यांत्रिकी झाडू खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यासाठी सहा विभागांसाठी सहा यंत्रे खरेदीच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. यांत्रिकी झाडू खरेदीसाठी ३३ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे.

पूर्व व पश्‍चिम विभागात बाजारपेठ, मुख्य रस्ते तसेच कॉलनीअंतर्गत रस्ते स्वच्छ करण्यासाठी सातशे कर्मचाऱ्यांची आऊटसोर्सिंगद्वारे नियुक्ती करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ आता रिंगरोड स्वच्छतेसाठी यांत्रिक झाडू खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी केंद्र शासनाच्या पंधराव्या वित्त आयोगाचा निधी खर्च केला जाणार आहे. यांत्रिक झाडू खरेदी ऑपरेटिंग व पाच वर्षांसाठी देखभाल- दुरुस्तीसाठी ३३ कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव महासभेवर मंजूर करण्यात आला. त्यानुसार आता सहा विभागांसाठी प्रत्येकी एक यांत्रिकी झाडू खरेदीसाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत.

शहरातील २, १५० किलोमीटर लांबीचे रस्ते असून, यातील ९० किलोमीटर रिंगरोड व बाह्य वळण रस्त्यांची सफाई यांत्रिकी झाडूद्वारे केली जाणार आहे. एका यांत्रिकी झाडूसाठी दोन कोटी सहा लाख रुपये खर्च येणार आहे. त्याव्यतिरिक्त प्रती यंत्र ऑपरेशन, देखभाल दुरुस्ती, इंधन, मनुष्यबळ पुरविण्यासाठी प्रतिमहा पाच लाख ८५ हजार ७०० रुपये इतका खर्च येणार आहे. पाच वर्षासाठी एकूण २१ कोटी ८ लाख रुपये इतका खर्च केला जाणार आहे.

शहर स्वच्छतेसाठी यांत्रिकी झाडूची आवश्‍यकता आहे. सफाई कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याने यांत्रिकी झाडूचा पर्याय स्वीकारण्यात आला आहे.

- सतीश कुलकर्णी, महापौर

loading image
go to top