कपाट दुरुस्तीच्या बहाण्याने
भामट्याचा आठ लाखांची चोरी
सकाळ वृत्तसेवा
सटाणा ता.२८ : कपाटाचे हँडल दुरुस्तीच्या बहाण्याने घरात आलेल्या अनोळखी व्यक्तीने ८ लाख ६९ हजार ६३४ रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना पद्मानगर परिसरात घडली. सटाणा पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाक्षी रोडलगत रामनगर भागातील पद्मानगर येथे राहणारे सुरेश दत्तात्रय कापडणीस (वय ७१) यांच्या घरातील गोदरेज कपाटाचे हँडल दुरुस्तीसाठी त्यांनी चावी दुरुस्तीसाठी एकाला बोलावले होते. संबंधित व्यक्तीने कपाटाच्या दुरुस्ती दरम्यान संशयिताने पाणी मागितल्यानंतर कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यांचा डबा गायब झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. कपाटाच्या दुरुस्तीसाठी लागणारी पट्टी वेल्डिंग करावी लागेल, असे सांगून संबंधित व्यक्ती घराबाहेर पडली. काही वेळाने घरातील महिलेला जोडवे हवे असल्याने कपाटातील दागिने शोधण्यात आले. त्यावेळी लॉकरमध्ये ठेवलेला दागिन्यांचा डबा आढळून आला नाही. घरात शोधाशोध करूनही डबा न मिळाल्याने कापडणीस यांनी सटाणा पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये दोन सोन्याच्या अंगठ्या, वेगवेगळ्या वजनांचे सोन्याचे वेढे, एक सोन्याची चेन आणि सोन्याची शॉर्ट गंठण पोत यांचा समावेश आहे. या दागिन्यांची एकूण किंमत ८ लाख ६९ हजार ६३४ रुपये असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. संशयिताचे वय अंदाजे ३५ ते ४० वर्षे असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक उपनिरीक्षक भाऊसाहेब आहिरे तपास करीत आहेत.