फोटो : B10813
कार्बन नाका परिसरातील
अपघातात दोघांचा मृत्यू
औद्योगिक वसाहतीतील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
सकाळ वृत्तसेवा
सातपूर, ता.१७ : सातपूर औद्योगिक वसाहतीतील कार्बन कंपनीसमोरील म्हसोबा मंदिराजवळ मंगळवारी (ता. १७) सकाळी दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला आहे.
राजेश कृष्णा भोये (२५, रा. निशाणखडक, ता. पेठ) आणि धनंजय समाधान पगार (२१, रा. शिवाजीनगर, सातपूर) अशी मृतांची नावे आहेत. राजेश भोये हा सकाळी सातच्या सुमारास (एमएच १५ एलडी ३७८४) क्रमांकाच्या दुचाकीने जात असताना समोरून येणाऱ्या (एमएच ४१ डीवाय ५७६३) क्रमांकाच्या दुचाकीशी त्याची जोरदार धडक झाली. या दुचाकीवर धनंजय पगार आणि महेश दिलीप क्षीरसागर (२१, रा. गायत्री कॉलनी, अशोकनगर, सातपूर) प्रवास करीत होते.
धडकेत राजेश भोये याचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर जखमी झालेल्या धनंजय पगार याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. महेश क्षीरसागर याची प्रकृती चिंताजनक असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, कार्बन नाका परिसरातील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अपघाताचे नेमके कारण पोलिस तपासानंतर स्पष्ट होणार आहे.