Nashik Crime : जनता को ऑपरेटीव्ह बँकेतील गैरव्यवहारात मुख्य कार्यकारी अधिकारी, रोखपाल यांच्याविरुध्द गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

Nashik Crime : जनता को ऑपरेटीव्ह बँकेतील गैरव्यवहारात मुख्य कार्यकारी अधिकारी, रोखपाल यांच्याविरुध्द गुन्हा

मालेगाव (जि. नाशिक) : शहरातील जनता को ऑपरेटीव्ह बँकेत मुख्य कार्यकारी अधिकारी व रोखपालाने संगनमताने २८ लाख ८० हजाराचा गैरव्यवहार केल्याने खळबळ उडाली आहे. जनता बँक मुस्लीम बहुल पुर्व भागातील अ वर्ग दर्जाची अग्रणी बँक आहे. या बँकेतच गैरव्यवहार झाल्याने खातेदारांमध्ये चिंता व्यक्त करण्यात येत आहे. (Case against Chief Executive Officer Cashier in Janata Cooperative Bank malpractice Nashik Crime news)

हेही वाचा : भारतीय क्रिकेटची नवी आशा- पृथ्वी शाॅ

इस्लामपुरा वॉर्ड औद्योगिक सहकारी संस्थेच्या आवारात जनता को ऑपरेटीव्ह बँकेचे मुख्य कार्यालय आहे. बँकेच्या शहरात अन्यत्र पाच शाखा आहेत. बॅंकेच्या मुख्य कार्यालयातील मुख्य कार्यकारी अधिकारी अन्सारी इम्तियाज अहमद अहमदउल्ला (वय ६२) व रोखपाल जावेद अहमद सिद्दीक अहमद (वय ३१) यांनी संगनमत करुन २८ लाख ८० हजाराची रक्कम हडप केली.

याबाबत शंका आल्याने तक्रार व चौकशी करण्यात आली. बँकेच्या स्ट्रॉंग रुममधील गोदरेज कंपनीच्या लोखंडी सेफमधील रोख रक्कम रिझर्व बँकेचे निरीक्षक अधिकारी चिरंजीव पल्लव यांनी प्रत्यक्ष पडताळणी केली असता ५०० रुपयाच्या नोटांचे बंडलच्या तळाशी पाठीमागील बाजूस पाचशे रुपयांच्या नोटांच्या जागी २० रुपयांच्या नोटांचे बंडल ठेवून कॅश बुकमध्ये नमूद करण्यात आले.

प्रत्यक्षात एकूण शिल्लक रक्कमेपैकी २८ लाख ८० हजर रुपये कमी मिळून आले. यानंतर दोघांनी संगनमताने गैरव्यवहार व विश्‍वासघात केल्याचे आढळून आले. शाखा व्यवस्थापक जुनैद अहेमद इकबाल अहमद (वय ४२, रा. रविवार वॉर्ड, रसुलपुरा) यांच्या तक्रारीवरुन दोघांविरुध्द शहर पोलिस ठाण्यात अपहार व आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.