पान ३ साठी-
------------
मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठीच्या
३५ लाखांचा हिशेबच नाही
मनपा आरोग्य विभागाला समाजकल्याणचा दणका
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ३० ः ज्येष्ठ नागरिकांच्या मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी केंद्र सरकारकडून मिळालेल्या ३५ लाख रुपयांच्या निधीचा हिशेब देण्यास नाशिक महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने टाळाटाळ केल्याने समाजकल्याण विभागाने संताप व्यक्त केला आहे. वारंवार पत्र देऊनही उपयोगिता प्रमाणपत्र सादर न झाल्याने साहाय्यक आयुक्त देविदास नांदगावकर यांनी महापालिकेला तिसरे स्मरणपत्र बजावले आहे.
--------
केंद्राच्या अटल वयो अभ्युदय योजनेंतर्गत मोतिबिंदू मुक्त भारत अभियानासाठी हा निधी मंजूर झाला होता. स्नॅप प्रणालीद्वारे हा निधी थेट महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडे वर्ग करण्यात आला होता. नियमानुसार निधी मिळाल्यापासून तीन महिन्यांत खर्चाचा आर्थिक, भौतिक अहवाल आणि उपयोगिता प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे. मात्र प्रत्यक्षात निधी घेऊन महिने उलटून गेले तरी महापालिकेने एकही कागद सादर केलेला नाही. यापूर्वी १६ जुलै, १९ ऑगस्ट आणि ५ ऑक्टोबर २०२६ रोजी समाजकल्याण विभागाने पत्रव्यवहार करूनही दखल घेतली गेली नाही. पुण्यातील समाजकल्याण आयुक्तालयाकडून सातत्याने आढावा घेतला जात असल्याने स्थानिक कार्यालयाला पाठपुरावा करावा लागत आहे. ३५ लाख रुपये खर्चाचा नेमका विनियोग कुठे झाला, किती ज्येष्ठांच्या शस्त्रक्रिया झाल्या, याचा थांगपत्ता नसल्याने महापालिकेच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. आता विहित नमुन्यातील प्रपत्र ''अ'' मध्ये तातडीने प्रमाणपत्र सादर करावे, असे निर्देश देत या पत्राची प्रत थेट महापालिका आयुक्तांनाही पाठवण्यात आली आहे.
----------------------