सेकंड मेन
-----------
YEO26B27181
येवला : नगरपालिकेत कर्मचाऱ्यांचा गौरव करताना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद. सोबत अध्यक्ष राजेंद्र लोणारी, मुख्याधिकारी तुषार आहेर आदी.
----------------
सुरक्षिततेला प्राधान्य देत कर्तव्य पार पाडावे
-----------
जिल्हाधिकारी प्रसाद : येवल्यात स्वच्छता कर्मचाऱ्यांना पीपीई किट, आयुष्मान कार्डचे वाटप; कर्मचाऱ्यांचा गौरव
-----------
सकाळ वृत्तसेवा
येवला, ता.१७ : स्वच्छता कर्मचाऱ्यांचे शहराच्या स्वच्छतेत आणि नागरिकांचे आरोग्य जपण्यात महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या सुरक्षिततेची काळजी घेत कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले.
येथील नगरपरिषदेत सेवा संकल्प अभियानांतर्गत कार्यक्रमात श्री. प्रसाद बोलत होते. नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, उपायुक्त शाम गोसावी, प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबा महाजन, मुख्याधिकारी तुषार आहेर आदी उपस्थित होते.
नगरपरिषदेत आयोजित कार्यक्रमात स्वच्छता कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेच्या दृष्टीने पीपीई किटचे वाटप करण्यात आले. स्वच्छता क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. कर्मचाऱ्यांना आयुष्मान कार्डचे वितरण, पर्यावरणदूतांना नियुक्तीपत्रांचे वाटप आणि स्वच्छता कर्मचारी वैभव जोरवेकर यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
जिल्हाधिकारी प्रसाद यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी, समस्या आणि अपेक्षा जाणून घेतल्या. उपायुक्त गोसावी यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करत कामाचे महत्त्व अधोरेखित केले. स्वच्छता व आरोग्य सभापती पारुल गुजराथी यांनी नगरपरिषदेच्या माध्यमातून स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
मुख्याधिकारी आहेर यांनी सेवा संकल्प अभियानांतर्गत १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी विविध उपक्रम राबविण्यात आल्याचे सांगितले. कर्मचाऱ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, त्यांच्या आरोग्य व सुरक्षिततेला प्राधान्य देणे, क्षमता बांधणी प्रशिक्षण आयोजित करणे आणि त्यांच्या कार्याचा गौरव करणे, या उद्देशाने अभियान राबविण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
उपनगराध्यक्ष पुष्पा गायकवाड, गटनेते दीपक लोणारी, नगरसेवक समीर समदिया, समर्थ अलगट, नगरसेविका छाया क्षीरसागर, आस्थापना प्रमुख आश्विन पुंड, स्वच्छता निरीक्षक पूनम भामरे, वृषाली अहिरे, प्रभाकर वाघ आदी उपस्थित होते. संदीप बोढरे यांनी सूत्रसंचालन केले.
-------------------