ॲंकर
-----------
NSK26H31147
जळगाव : ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करताना मान्यवर.
------
ज्येष्ठ नागरिक ही देशाची संपत्ती
----
जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाच्या कार्यक्रमात मान्यवरांचा सूर
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २ : ज्येष्ठ नागरिक हे केवळ वयाने ज्येष्ठ नसून, ते आपल्या कुटुंबाची, समाजाची व देशाची अमूल्य संपत्ती आहेत. ज्या घरात ज्येष्ठ नागरिक असतात, त्या घरातील बालगोपालांना त्यांच्या अनुभवातून संस्कार, ज्ञान व जीवनमूल्यांची शिदोरी मिळत असते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचा आदर व सन्मान करणे ही आपली संस्कृती व सामाजिक जबाबदारी आहे, असा सूर कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला.
तालुक्यातील शिरसोली येथील जिजामाता शैक्षणिक संस्थेच्या प्रांगणात प्रेरणा ज्येष्ठ नागरिक संघ, विविध ज्येष्ठ नागरिक संघांचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत मुख्य कार्यक्रम झाला, त्यात उपस्थित मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अध्यक्षस्थानी फेस्कॉमचे माजी अध्यक्ष डी. टी. चौधरी होते. प्रमुख पाहुणे म्हणून समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील, जगतराव पाटील, ॲड. अरुण धांडे, प्रा. सुरेश पांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
जिजामाता शैक्षणिक संस्थेत समाज कल्याण विभागातर्फे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन व सेवा संकल्प अभियानानिमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने सकाळी शिरसोली शहरातून प्रभात फेरी काढण्यात आली. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिर झाले. या शिबिरात नेत्रतपासणी, सर्वसाधारण आरोग्य तपासणी करण्यात आली.
जी.पी.टी.एम. (आजी-आजोबा, शिक्षक व मुले) बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत आजी-आजोबांनी आपल्या नातवंडांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत शिक्षकांकडून माहिती घेतली. यावेळी उपस्थितांनी ज्येष्ठ नागरिकांच्या प्रतिष्ठेचा आदर करण्याची शपथ घेतली. ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याबाबत डॉ. अनिरुद्ध साळुंखे व डॉ. पाठक यांनी मार्गदर्शन केले. प्राचार्य संभाजी देसाई, प्रा. सुरेश पांडे, जगतराव पाटील व डी. टी. चौधरी यांनी ज्येष्ठ नागरिकांचे सामाजिक, कौटुंबिक व राष्ट्रीय योगदान याबाबत मार्गदर्शन केले. प्राचार्य कल्पना प्रमोद पाटील यांनी आभार मानले. राजेंद्र कांबळे, निरीक्षक सुनील महाजन, वरिष्ठ लिपिक अरुण वाणी व कर्मचाऱ्यांनी उपक्रमासाठी सहकार्य केले.